अलातचक्र

Contributed byभारती सुदामे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

फिरणाऱ्या वस्तूंचा वेग वाढल्यावर त्या एकरूप दिसतात. मानवी जीवनातील प्रगतीचे हेच सूत्र आहे. मनाची गती विचारांच्या गतीवर अवलंबून असते. पंचमहाभूतांनी बनलेले शरीर त्रिगुणांमुळे गतिमान होते. सांख्यदर्शनानुसार, प्रकृती ही शक्ती आहे आणि पुरुष शिव आहे. सत्व, रज आणि तम या गुणांचे योग्य प्रमाण राखल्यास मानवी जीवन सृष्टीसारखे संतुलित राहते.

अलातचक्र

खादी मशाल हातात घेऊन जोरात गरगर फिरवली तर ती मशाल न दिसता त्याजागी एक अग्निचक्र दिसतं, गोलगोल फिरणारं. आपल्या माथ्यावर फिरणारा पंखा जरी अतिशय वेगानं फिरत असला तरी त्याची पाती वेगवेगळी न दिसता नुसतंच एक वर्तुळ दिसतं. गती वाढली की भिन्नता दिसेनाशी होते, अभिन्नता निर्माण होते. या गतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, तेवती मशाल असो किंवा पंख्याची पाती, ती एकाच गतीनं आणि एकाच दिशेनं फिरायला हवीत. मानवी जीवनात होणाऱ्या अंतर्बाह्य प्रगतीचं हेच सूत्र आहे. भौतिक विकासाच्या टप्प्यावर ज्या क्षणी चाकाचा शोध लागला, त्या क्षणापासून त्याच्या विकासाला ‘न भूतो...’ अशी गती मिळाली. मनाची गती तर मोजता न येणारी. त्यापेक्षा अधिक गती असणारं दुसरं काही नाही. आपलं मन अन् त्याची गती म्हणजे नेमकं काय? मनाची गती म्हणजे विचारांची गती. मनाचं कामच विचार करणं आहे. आपलं शरीर मनातल्या विचारांनी चालतं. मनात येणारे विचार बाह्य परिस्थिती, आपल्या आसपासचं आणि आंतरिक वातावरण यांच्यावर निश्चित होत असतात. तिथंही तर चक्र आहेतच. अगदी सहस्रारचक्रापासून मूलाधारापर्यंत. संपूर्ण विश्वाचीही गती चक्राकारच असते. ब्रह्मांडसुद्धा चक्राकार गतीनंच चित्रित केलेलं आढळतं. तरीही ही पृथ्वी स्थिर आहे असं आपल्याला जाणवतं; कारण एकच, या सगळ्या गती एकमेकांशी सुसंगत आहेत, एकमेकांना पूरक आहेत आणि त्यांचा समतोल अत्यंत उचित साधलेला आहे. यालाच प्रकृतीचा समतोल असं म्हणतात. आपल्यातही असाच एक समतोल अपेक्षित असतो. तोही प्रकृतीचाच असतो. पंचमहाभूतांनी तयार झालेलं हे मानवी शरीर त्रिगुणात्मिका प्रकृतीमुळे गतिमान आहे. जड शरीर चेतन प्रकृतीमुळे चलनवलन करतं. प्रकृती ही ‘शक्ती’ आहे आणि पुरुष ‘शिव’ असं सांख्यदर्शन सांगतं. पुढे ते हेही म्हणतं की, ‘शक्ती’चा ईकार नसेल तर ‘शिवा’चं ‘शव’ व्हायला वेळ लागणार नाही. हा ‘ईकार’ प्रकृतीच्या तीन गुणांचा... सत्व-रज-तमाचा! या गुणांचं गुणोत्तर उचित प्रमाणात असेल तर मानवाचाही समतोल सृष्टीसारखाच उत्तम राखला जाऊन त्याची प्रकृती शक्तीच्या रूपात अवतरेल. त्याच वेळी म्हणणं शक्य होईल - ‘या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।’