इस्लामिक स्टेटने (आयएस) एक नवी रणनीती आखली असून, त्यानुसार भारताच्या आसपासच्या विविध देशांतील कट्टरपंथींचा वापर प्रचार आणि हल्ले करण्यासाठी केला जाणार आहे. २०१३ च्या सुरुवातीला इस्लामिक स्टेटने स्वतःची घोषणा केली, तेव्हा भारतातून अनेक जण या संघटनेत सामील होण्यासाठी गेले. मात्र, गेल्या काही वर्षांत सुरक्षा यंत्रणांनी ‘आयएस’मध्ये सहभागी होण्यासाठी देश सोडून जाणाऱ्या अनेकांना रोखले.
एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘इस्लामिक स्टेटचे पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंकेत स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. इस्लामिक स्टेटच्या श्रीलंका मॉड्यूलचे परिणाम तमिळनाडू आणि मंगळुरूमध्ये दिसून आले. या दोन्ही ठिकाणी इस्लामिक स्टेटशी संबंधित एका कट्टरपंथीने हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही वेळा तो अयशस्वी ठरला. या घटनांमधील आरोपी जमेशा मुबीन व मोहम्मद शरीक या दोघांनाही श्रीलंकेतील एकाच व्यक्तीने कट्टरपंथी बनवले. श्रीलंकेतील ‘ईस्टर बॉम्बिंग’चा सूत्रधार झहरान हाशिम हा त्या देशातील प्रमुख होता. तो दक्षिण भारतात येऊन राहिला होता.
धोक्याचे मूल्यांकन करताना एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘बांगलादेशकडून होणारा दबाव सर्वाधिक आहे. इस्लामिक स्टेट चे मुखपत्र असलेल्या ‘दाबिक’च्या अलीकडील अंकात ‘द रिव्हायव्हल ऑफ जिहाद इन बेंगॉल’ या शीर्षकाचा लेख प्रकाशित झाला होता, ज्यात तरुणांना जिहादसाठी स्वत:ला समर्पित होण्याचे आवाहन करण्यात आले होते. बांगलादेशमधील इस्लामिक स्टेट मॉड्यूलने भारतात आपला अजेंडा राबवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.’







