‘लक्ष्य’, ‘आयुष्य’ पुस्तकांचे प्रकाशन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यात ज्येष्ठ लेखक दत्तात्रय पाठक यांच्या 'लक्ष्य' आणि 'आयुष्य' या पुस्तकांचे प्रकाशन झाले. राष्ट्र सेवा दलातर्फे डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना 'साने गुरुजी समता पुरस्कार' मिळेल. अनिल टांकसाळे यांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. डॉ. न. म. जोशी आणि विजय सरदेशपांडे यांनाही पुरस्कार दिले जातील. हे सोहळे लवकरच होणार आहेत.

‘लक्ष्य’, ‘आयुष्य’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : ज्येष्ठ लेखक दत्तात्रय पाठक लिखित, मधुश्री प्रकाशननिर्मित ‘लक्ष्य’ आणि ‘आयुष्य’ या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांच्या हस्ते झाले. पाठक यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचे औचित्य साधून पुस्तक प्रकाशनाचा हृद्य सोहळा पार पडला. पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या कार्यक्रमावेळी मधुश्री प्रकाशनाचे पराग लोणकर, अंजली पाठक, डॉ. श्रीरंग जोशी, डॉ. अर्चना जोशी. डॉ. अपर्णा पाठक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर यांचा गौरव

पुणे : राष्ट्र सेवा दलातर्फे ‘दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’चे (भारतीय बौद्ध महासभा) राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना ‘साने गुरुजी समता पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. चार जून रोजी साने गुरुजी स्मारक येथे आयोजित दलाच्या पुनर्गठन दिन मेळाव्यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी समाजवादी नेते कपिल पाटील, अजित शिंदे, जयवंत पाटील उपस्थित राहतील, असे राजा कांदळकर यांनी सांगितले.

टांकसाळे यांना पुरस्कार

पुणे : नागपूरच्या अनिल बुक एजन्सीचे संचालक अनिल टांकसाळे यांना यंदाचा अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांना ‘साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार’ आणि विजय सरदेशपांडे यांना ‘मुद्रित शोधक पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. ३० मे रोजी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे सोहळ्याचे आयोजन केल्याचे राजीव बर्वे यांनी सांगितले.