एकीच्या प्रयत्नांना झटका

महाराष्ट्र टाइम्स

पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत एकतेची गरज व्यक्त केली आहे. मात्र, त्यांच्या या आवाहनाला काँग्रेस आणि माकपने थंड प्रतिसाद दिला आहे. भाजप हाच मुख्य शत्रू असल्याचे सांगत त्यांनी 'इंडिया'ला अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, ज्या पक्षांना त्यांनी बंगालमध्ये एकत्र घेतले नव्हते, ते आता प्रतिसाद देण्याच्या मनस्थितीत नाहीत.

एकीच्या प्रयत्नांना झटका
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

दीड दशकानंतर पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये एकतेची गरज बोलून दाखविली असली, तरी त्यांचे हे आवाहन आघाडीतील पक्षांनी झटकले आहे. बॅनर्जी यांच्या भाजपविरोधी एकतेच्या ताज्या मोहिमेला काँग्रेस आणि माकपने थंड प्रतिसाद दिला आहे.

डाव्या आणि अति-डाव्या पक्षांसह सर्व विरोधी पक्षांना भाजपविरोधात एक समान व्यासपीठ तयार करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करताना, ‘भाजप हाच आपला मुख्य शत्रू आहे. आता माझे ध्येय स्पष्ट असून ‘इंडिया’ला अधिक मजबूत करेन,’ असे ममता म्हणाल्या. मात्र, त्यांनी ज्या विरोधी पक्षांना बरोबर घेण्यास बंगालमध्ये नकार दिला होता, ते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याच्या मनस्थितीत नाहीत. माकपने त्यांचे आवाहन त्वरित फेटाळून लावले.