नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी श्रीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचा दर्जा, व्यवसाय नियम आणि जम्मू-काश्मिरशी संबंधित इतर मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचे सांगितले.
बेंगळुरूत बॉम्बची धमकी
बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेंगळुरू दौऱ्यादरम्यान बॉम्बच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा काही काळ हाय अलर्टवर आली होती. मात्र, ‘बॉम्बची धमकी खोटी होती; एका तासाच्या आत संशयिताला ताब्यात घेण्यात आले,’ असे शहर पोलिस आयुक्त सीमंतकुमार सिंह यांनी सांगितले. तपासादरम्यान धमकीचा फोन कोरमंगलामधील केएचबी कॉलनीतून करण्यात आला होता.
अभिनेत्यासह दोघे ठार
हैदराबाद : ट्रकला भरधाव कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तेलुगू अभिनेत्यासह दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात १० मे रोजी पहाटे ३.२०च्या सुमारास आउटर रिंग रोडवर घडला. यामध्ये अभिनेता भरत कांत (वय ३१) आणि कॅमेरामन जी. साई त्रिलोक यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून हैदराबादला परत येत होते.
मोठा शस्त्रसाठा जप्त
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी रशीद केबलवाला-हाशिम बाबा टोळीशी संबंधित सहा सक्रिय सदस्य आणि शार्पशूटरना अटक केली असून, त्यांच्याकडून एक रायफलसह १० बेकायदा शस्त्रे व ८१ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेले सर्व संशयित ईशान्य दिल्लीचे रहिवासी आहेत. मोठा शस्त्रसाठा गोळा करून आरोपी प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांवर हल्ले करण्याची योजना आखत होते.
महिलांचा विनयभंग
नवी दिल्ली : दक्षिण-पूर्व दिल्लीतील नेहरू प्लेस परिसरातील एका क्लबबाहेर तरुणांच्या एका गटाने ईशान्य भारतातील दोन महिलांचा विनयभंग करून मारहाण केली; तसेच वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चार जणांची ओळख पटली असून, त्यांच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आली आहेत. हा प्रकार १० मे रोजी पहाटे साडेसहा वाजता घडला.
घरकामगार महिलेचा छळ
बेंगळुरू : मणिपूरच्या एका २३ वर्षीय महिलेने बेंगळुरूतील आयआयएम परिसरात घरमालकाकडून अनेक वेळा छळ आणि मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार १ जून २०२१ ते ४ मे २०१६ या कालावधीत घडला. पीडित महिला सहा वर्षांपासून दाम्पत्याकडे मुलांची काळजीवाहू म्हणून काम करीत होती. अखेर तिने शेजाऱ्यांकडे मदत मागितल्याने हा प्रकार समोर आला.
घोटाळ्याप्रकरणी अटक
जयपूर : राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी राज्यमंत्री महेश जोशी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय बडाया यांना ९६० कोटींच्या कथित जल जीवन मिशन घोटाळ्याप्रकरणी अटक केली. थायलंडहून परतत असलेल्या बडाया यांना सोमवारी पहाटे दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना जयपूरला आणले जात असल्याचे एसीबीचे महासंचालक गोविंद गुप्ता यांनी सांगितले.
पाककडून पाचारण
इस्लामाबाद : खैबर-पख्तुनख्वामध्ये टीटीपीने पोलिस चौकीवर केलेल्या घातक हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने सोमवारी अफगाणिस्तानच्या राजदूतांना बोलावून या कृतीचा ‘कडक निषेध’ नोंदवला. खैबर-पख्तुनख्वाच्या बन्नू जिल्ह्यातील पोलिस चौकीवर शनिवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानचे किमान १५ जवान ठार आणि अनेक जखमी झाले.









