राजनाथ सिंह यांनी सोमवारी आंतर मंत्रिगटाची उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात युरोप दौऱ्यावर जाणार असून ते १५ ते २० मे दरम्यान नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीसारख्या देशांना भेट देतील. त्याबाबत त्यांनी ही बैठक बोलावली. ‘जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक सहभागामुळे आत्मनिर्भरता आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित होईल,’ असे सांगून राजनाथ यांनी मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा दिला. त्यांनी मंत्रिगटाच्या बैठकीत जीवनावश्यक वस्तू व स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठा साखळीची माहिती संबंधित मंत्र्यांकडून घेतली.
पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागरिकांना काटकसर करण्याची हाक दिली. यानंतर सोमवारी विरोधकांनी मोदी यांच्या या आवाहनावर टीकेची झोड उठवली, तर ‘मोदी यांनी राष्ट्रहितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे,’ असा बचाव भाजप नेत्यांनी केला. दुसरीकडे, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि घाबरून न जाण्याचे आवाहन केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रियांका चतुर्वेदी, माकपचे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी मोदी यांनी केलेल्या आवाहनांवर टीका केली, तर केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जनता दल (सेक्युलर) पक्षाचे वरिष्ठ नेते एच. डी. देवेगौडा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी यांच्या भूमिकेला समर्थन दिले.
‘पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना त्याग करण्यास सांगितले. तो उपदेश नाही, तर अपयशाचा पुरावा आहे. कारण १२ वर्षांच्या अपयशाची सर्व जबाबदारी ते नागरिकांवर ढकलतात. मोदी यांनी १२ वर्षांत देशाला अशा टप्प्यावर आणले आहे, की नागरिकांना काय खरेदी करावे, काय करू नये, कुठे जावे आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावे लागत आहे,’ असा आरोप राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर केला. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी, पंतप्रधानांचे आवाहन या सरकारची आर्थिक नामुष्की असल्याची टीका केली.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे (सीआयआय) आयोजित उद्योग परिषदेसाठी दिल्लीत आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ‘राहुल गांधी या देशातील सर्वाधिक नाकारलेले नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जे सांगितले त्याचा अर्थ राहुल गांधी यांना कळला नाही,’ असे ते म्हणाले.
संबंधित वृत्त... फ्रंट पेज २









