‘कार्यक्रमाच्या निमित्ताने तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात कार्यरत दोन संस्था एकत्र आल्या आहेत. आपल्याकडे या दोन्ही घटकांसाठी स्वतंत्र विद्यापीठ, महाविद्यालये आहेत. मात्र, विज्ञान-तंत्रज्ञान यांचा एकत्रित अभ्यासक्रमांची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठांना सूचना करावी, गरज असल्यास अभ्यासक्रम तयार करून द्यावेत,’ असे डॉ. विद्यासागर यांनी सांगितले.
‘वाहतूक कोंडीत जगात पुण्याचा पाचवा क्रमांक आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी उड्डाणपुलांची गरज नसून, तो अखेरचा पर्याय असला पाहिजे,’ असे परखड मत ज्येष्ठ उद्योगपती आणि कायनेटिक समूहाचे अध्यक्ष डॉ. अरुण फिरोदिया यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘उड्डाणपूल करायचाच असल्यास तो केवळ दुचाकी, तीनचाकींसाठी करायला हवा. कारण याच प्रकारची सर्वाधिक वाहने रस्त्यावर असतात,’ असेही डॉ. फिरोदिया यांनी सांगितले.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आणि महाराष्ट्र विज्ञान अकादमीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दी इन्स्टिट्यूटशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) पुणे विभागाने महाराष्ट्र विज्ञान अकादमीच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात डॉ. फिरोदिया बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, महाराष्ट्र विज्ञान अकादमीचे अध्यक्ष डॉ. दिनेश अमळनेरकर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स पुणे विभागाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय बोरमाणे, के. जी. कानडे आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. के. सी. मोहिते लिखित ‘सिरिन्डीपिटी’ या पुस्तकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले; तसेच महाराष्ट्र विज्ञान अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी खास बोधचिन्हाचे आणि पुनर्निर्मिती केलेल्या वेबसाइटचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. फिरोदिया म्हणाले, ‘पुण्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळांत बदल करायला हवा. वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड आकारावा, बंद पडलेल्या सरकारी शाळा चांगल्या संस्थांना चालवायला दिल्या पाहिजेत म्हणजे घराजवळ शाळा होतील. सध्याचे रस्ते प्रशस्त केले पाहिजेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वाहतूक समस्या सोडवायला हवी. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व गोष्टी चालत जाऊन खरेदी करता येतील, अशा अंतरावर हव्यात, म्हणजे उपनगरांतून नागरिक मध्यवर्ती भागात खरेदीसाठी येणार नाहीत. पीएमपी बसना प्राधान्य द्यायला हवे, भुयारी मार्ग करावेत, विमानतळ आणि रेल्वे स्थानकापासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी.
याशिवाय शहराभोवती पाच-पाच लाख लोकसंख्येची नगरे विकसित केल्यास पुण्यावरील नागरीकरणाचा ताण कमी होईल; तसेच झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या छान झोपेसाठी मातीची खिडकी आणि भूमिगत जलशीतलन बिछान्याची सोय करावी. या दोन्हींसाठी दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सने काम करावे.’







