पश्चिम बंगालमध्ये मतदारयाद्यांच्या ‘विशेष सखोल पडताळणी’दरम्यान (एसआयआर) मतदारांची नावे वगळण्यात आल्यामुळे काही विधानसभा मतदारसंघांमधील निकालांवर लक्षणीय परिणाम झाल्याचे म्हणणे तृणमूल काँग्रेसने सोमवारी न्यायालयात मांडले. या प्रक्रियेदरम्यान वगळलेल्या मतदारांची संख्या भाजपने विजय मिळवलेल्या ३१ जागांवरील मताधिक्याहून अधिक असल्याचा दावाही पक्षाने यावेळी केला.
‘राज्यातील ३१ मतदारसंघांमध्ये भाजपच्या तृणमूलवरील विजयाचा फरक हा ‘एसआयआर’ प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आलेल्या मतदारांच्या संख्येपेक्षा कमी होता’, असे तृणमूलचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कल्याण बॅनर्जी यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत व न्या. बागची यांच्या खंडपीठासमोरील सुनावणीवेळी नमूद केले.






