ममतांच्या एकीच्या प्रयत्नांना झटका

Contributed byनवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स

पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. भाजपला हरवण्यासाठी 'इंडिया' आघाडीने त्वरित एकत्र यावे, असा त्यांचा आग्रह आहे. मात्र, काँग्रेस आणि माकपने त्यांच्या आवाहनाला थंड प्रतिसाद दिला आहे. माकपने तर त्यांच्या आवाहनावर टीका केली आहे. बॅनर्जींच्या एकीच्या प्रयत्नांना यामुळे झटका बसला आहे.

ममतांच्या एकीच्या प्रयत्नांना झटका
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पश्चिम बंगालमध्ये दीड दशकानंतर सत्ता गमावल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये एकतेची गरज बोलून दाखविली असली, तरी त्यांचे हे आवाहन आघाडीतील पक्षांनी झटकले आहे. बॅनर्जी यांच्या भाजपविरोधी एकतेच्या ताज्या मोहिमेला काँग्रेस आणि माकपने थंड प्रतिसाद दिला आहे.

बंगालमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर, बॅनर्जी यांनी भाजपला हरवण्यासाठी विरोधी पक्षांनी, म्हणजेच ‘ इंडिया आघाडी ’ने त्वरित एकत्र यावे, असा आग्रह धरला आहे. शुभेंदु अधिकारी यांनी शनिवारी पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला, त्याच दिवशी बॅनर्जी यांनी हे आवाहन केले. डाव्या आणि अति-डाव्या पक्षांसह सर्व विरोधी पक्षांना भाजपविरोधात एक समान व्यासपीठ तयार करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करताना, ‘भाजप हाच आपला मुख्य शत्रू आहे. आता माझे ध्येय स्पष्ट असून ‘इंडिया’ला अधिक मजबूत करेन,’ असे त्या म्हणाल्या.

मात्र त्यांनी ज्या विरोधी पक्षांना बरोबर घेण्यास बंगालमध्ये नकार दिला होता, ते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याच्या मनस्थितीत नाहीत. माकपने त्यांचे आवाहन फेटाळले. ज्येष्ठ नेते मोहम्मद सलीम यांनी बॅनर्जींच्य आवाहनावर टीका केली.