पुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण अभ्यासक्रमांसाठीची पीसीएम समूहाची दुसऱ्या संधीची सीईटी आज, मंगळवारपासून (१२ मे) सुरू होणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे परीक्षा १२ ते २० मेदरम्यान (१६, १७, १८ मे वगळून) दररोज दोन सत्रांत घेतली जाणार असून, राज्यभरातून तीन लाख २१,९१७ विद्यार्थी सहभागी होत आहेत.
ही परीक्षा संगणकाधारित पद्धतीने राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १९४ केंद्रांवर घेतली जात आहे. यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना ‘सीईटी’च्या दोन संधी उपलब्ध करून दिल्याने दुसऱ्या संधीबाबत उत्सुकता वाढली आहे. यापूर्वी ११ ते २० एप्रिलदरम्यान झालेल्या पहिल्या सत्रात चार लाख ७९ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयानुसार यंदापासून एमएचटी-सीईटी (पीसीएम, पीसीबी) आणि एमबीए-एमएमएस अभ्यासक्रमांसाठी दोनदा परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.






