नियम येताच दर वाढले

महाराष्ट्र टाइम्स

शहरातील आरएमसी प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण आणि वाहतूक अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने नवे नियम लागू केले आहेत. या नियमांमुळे आरएमसी प्रकल्पांच्या कामकाजावर मर्यादा आल्या आहेत. उत्पादन आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने आरएमसीच्या दरात वाढ झाली आहे. नागरिक आणि प्रशासनाच्या भूमिकेनंतर प्रकल्पचालकांनी नियम स्वीकारले आहेत. आता मर्यादित वेळेतच उत्पादन आणि वाहतूक शक्य होणार आहे.

reason for increase in ready mix concrete prices new environmental regulations

शहरातील रेडीमिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने; तसेच वाहतुकीमुळे अपघात होत असल्याने नागरिक आक्रमक झाले होते. त्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन नवे पर्यावरणीय व वाहतूक नियम लागू केले. त्याचा फटका आरएमसी प्रकल्पांना बसला असून, सुधारित नियमावलीमुळे मनुष्यबळ व अन्य खर्चात वाढ झाल्याने आरएमसीचालकांनी दरवाढ केली आहे.

आरएमसी प्रकल्पचालकांकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारींनंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली होती. त्याविरोधात काही दिवस काम बंद आंदोलन केलेल्या प्रकल्पचालकांनी अखेर नियम मान्य करून कामकाज पुन्हा सुरू केले. मात्र, या नव्या अटींमुळे उत्पादन आणि वाहतूक खर्चात वाढ होत असल्याने आरएमसीचे दर वाढविण्यात आल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने लागू केलेल्या नव्या नियमांनुसार रेडीमेड सिमेंट काँक्रिटचे उत्पादन आता मर्यादित कालावधीतच करता येईल. बुधवार, शनिवार आणि रविवारी पूर्णवेळ कामास परवानगी देण्यात आली असून, उर्वरित चार दिवस केवळ सहा तास काम करता येणार आहे. याशिवाय शहरातील ‘नो एंट्री’ मार्गांवर ट्रान्झिट मिक्सर वाहतुकीवर वेळेनुसार निर्बंध घालण्यात आले आहेत.