एसआयआरदरम्यान मतदारांची नावे वगळण्यात आल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये काही विधानसभा मतदारसंघांमधील निकालांवर लक्षणीय परिणाम झाल्याचे म्हणणे तृणमूल काँग्रेसने सोमवारी न्यायालयात मांडले. या प्रक्रियेदरम्यान वगळलेल्या मतदारांची संख्या भाजपने विजय मिळवलेल्या ३१ जागांवरील मताधिक्याहून अधिक असल्याचा दावाही पक्षाने यावेळी केला.
‘एका मतदारसंघात ५,४३२हून अधिक व्यक्तींची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली. इथे तृणमूलच्या उमेदवाराचा अवघ्या ८६२ मतांनी पराभव झाला’, असे तृणमूलचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कल्याण बॅनर्जी यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोरील सुनावणीवेळी नमूद केले.






