चार दिवस पूर्वमोसमी पाऊस

महाराष्ट्र टाइम्स

मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील चार दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी वादळामुळे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहील. मे महिन्याच्या अखेरीस पावसाच्या सरी कोसळणार आहेत. शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.

चार दिवस पूर्वमोसमी पाऊस
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मराठवाड्यात पूर्वमोसमी पाऊस दाखल झाला आहे. पुढील चार दिवस विभागात वेगवेगळ्या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरुपातील पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. जोरदार वादळामुळे झाडे कोसळून काही ठिकाणी नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने काही भागात ‘यलो ॲलर्ट’ घोषित केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात २७ आणि २८ मे रोजी मध्यम ते हलक्या स्वरुपात पाऊस होणार आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस होईल. तर २९ आणि ३० मे रोजी धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस होणार आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या ढगाळ वातावरण असले तरी उकाडा कायम आहे. तीव्र ऊन आणि पाऊस असे संमिश्र वातावरण दिसत आहे. काही भागात तुरळक गारांचा पाऊस झाला आहे. मे महिन्याच्या अखेरीस पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. येत्या ३० मेपर्यंत मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपात पावसाच्या सरी कोसळणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी कमाल तापमान ३९.८ अंश सेल्सिअस होते.

दरम्यान, वादळामुळे जालना जिल्ह्यात केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. परतूर तालुक्यातील रेवलगाव, सालगाव, सातोना बुद्रूक, मापेगाव, कोरेगाव, तोरणा परिसरात वादळासह झालेल्या पावसामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. तोरणा येथील शेतकरी गंगाराम पवार यांंची केळीची झाडे जमीनदोस्त झाली. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.