अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी पत्नी जीनेट रुबिओ यांच्यासह ताज महाल भेटीचे छायाचित्र पोस्ट केल्यानंतर इराणने त्यांना लक्ष्य केले. ‘पर्शियन स्थापत्यकलेचे प्रदर्शन घडविणाऱ्या ताज महालची उभारणी मुघल बादशाह शाहजहान यांनी १६३२ मध्ये केली होती. इराणी वंशाच्या पत्नीच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या वास्तूचा इतिहास रुबिओ यांना माहीत असता, तर त्यांनी फोटो काढला नसता,’ असा टोला इराणच्या भारतातील वाणिज्यदूतांनी लगावला.
(पान १ वरून)
इराणशी शांतता चर्चेत ‘प्रगती’ झाल्याचा दावा ट्रम्प यांनी सोमवारी केला होता. त्यानंतर काही तासांतच अमेरिकी लष्कराने इराणमध्ये हल्ले केल्याने पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण होण्याचे संकेत आहेत. शांतता करार आणि युद्धबंदीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
शांतता करारासाठी चर्चेत सहभागी झालेल्या देशांनी अब्राहम करारावर स्वाक्षरी करावी, असे आवाहन ट्रम्प यांनी केले होते. इस्रायल आणि अरब देशांदरम्यान राजनैतिक, आर्थिक आणि सुरक्षा संबंध प्रस्थापित करण्याबाबतचा हा करार आहे. अमेरिका-इराण यांच्यातील शांतता चर्चेत सहभागी असलेले संयुक्त अरब अमिराती, बहरिन या देशांनी आधीच या करारावर स्वाक्षरी केली आहे. आता सौदी अरेबिया, कतार, पाकिस्तान, तुर्किये या देशांनीही या करारावर स्वाक्षरी करावी, अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे. मात्र, त्यास कसा प्रतिसाद मिळेल, हे अनिश्चित असून, अनेक देश ट्रम्प यांचे आवाहन फेटाळण्याची शक्यता आहे.
पाकला कल्पना अमान्य
इस्लामाबाद : अब्राहम करारावर स्वाक्षरी करून इस्रायलला मान्यता देण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन मान्य करण्यास पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी विरोध केला. यामुळे शांतता चर्चेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाकची कोंडी झाली आहे.









