पाण्यासंबंधी प्रश्नांचा आयुक्तांवर भडिमार

महाराष्ट्र टाइम्स

छत्रपती संभाजीनगर शहरात जनगणनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलेले महापालिका आयुक्त अमोल येडगे यांना नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या समस्येवर जाब विचारला. आठवड्यातून एकदाच होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आयुक्तांनी वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आणि लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला.

पाण्यासंबंधी प्रश्नांचा आयुक्तांवर भडिमार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

जनगणनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापालिका आयुक्तांवर नागरिकांनी पाणीपुरवठ्यावरून प्रश्नांचा भडीमार केला. आठवड्यातून एकदाच होणारा पाणीपुरवठा सुरळीत केव्हा होणार, पाणीपुरवठ्यातील खंड कमी कधी होणार असे सवाल त्यांनी केले.

देशभरात सध्या जनगणना केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात या कामाची जबाबदारी सरकारने महापालिकेवर दिली आहे. शासनाच्या निर्देशानुसार अधिकारी - कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून महापालिकेने जनगणनेचे काम सुरू केले आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पालिकेचे आयुक्त अमोल येडगे मंगळवारी सकाळी नंदनवन कॉलनीत पोहोचले. जनगणनेच्या कामावरील पर्यवेक्षक काम योग्य पद्धतीने करीत आहेत की नाही, नागरिकांना प्रश्न विचारण्याची त्यांची पद्धत कशी आहे याची पाहणी त्यांनी केली. आयुक्तांनीदेखील नागरिकांना काही प्रश्न विचारले.

आयुक्तांचे प्रश्न विचारून झाल्यावर नागरिकांनी त्यांच्यावर पाण्यासंबंधीच्या प्रश्नांचा भडीमार केला. आठवड्यातून एकदाच होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक कमालीचे त्रासून गेले आहेत. त्यामुळे आयुक्तांसमोर नागरिकांनी व्यथा मांडल्या. नियमित पाणीपुरवठ्याचे काय, पाणीपुरवठ्यातील गॅप कधी कमी होणार, वेळेवर पाणीपुरवठा केव्हापासून होणार, दूषित पाण्याच्या समस्यांचे निराकरण कसे करणार, असे विविध प्रश्न नागरिकांनी विचारले.

आयुक्त अमोल येडगे यांनी नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. ‘वाढीव पाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, पाणीपुरवठ्यातील गॅप कमी होईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले.