तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी पडलेल्या अण्णाद्रमुकच्या आमदारांमध्ये सत्ताधारी तमिळगा वेत्री कळघम ( टीव्हीके ) पक्षाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर फूट पडली आहे. पक्षाचे प्रमुख एडाप्पाडी के. पलानीस्वामी यांच्याविरोधात बंडखोरी करण्याचे संकेतही दिसत आहेत.
राज्य विधानसभेच्या एकूण २३४पैकी १६७ जागा लढवणाऱ्या अण्णाद्रमुकला केवळ ४७ जागांवर विजय मिळवता आला. निवडणुकीच्या निकालानंतर पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांच्या अनेक बैठका पार पडल्या. यामध्ये पक्षाच्या एका गटाने ‘टीव्हीके’ला समर्थन देण्यास तीव्र विरोध केला, तर दुसऱ्या गटाने बाहेरून पाठिंबा दर्शवण्यास सहमती दर्शवली. काही आमदारांनी निवडणुकीतील वाईट कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पलानीस्वामी यांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. सी. वे. शणमुगम आणि एस. पी. वेलुमणी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते व समर्थक आमदारांनी पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकांमध्ये सहभाग घेतला नाही.
चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी सोमवारी बहुमत चाचणीच्या आधी द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांची अलवरपेट येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री विजय यांनी प्रथमच स्टॅलिन यांची भेट घेतली आहे.






