सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ‘वन केस, वन डेटा’ (एक खटला, एक माहिती) प्रणाली सुरू केली. त्याचबरोबर ‘सु-सहाय’ नावाचा चॅटबॉटदेखील कार्यन्वित केला.
सर्वोच्च न्यायालय ाच्या रजिस्ट्रारच्या सहकार्याने राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्राने ‘सु-सहाय’ विकसित केला आहे. याद्वारे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये आणि तहसीलस्तरीय न्यायालयांमधील माहिती एकमेकांशी जोडली जाईल, असे या उपक्रमाची घोषणा करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नमूद केले.
देशभरातील न्यायालयांमधील खटल्यांची माहिती एकत्रित करून न्यायालयीन प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनवणे हे ‘वन केस, वन डेटा’ प्रणालीचे उद्दिष्ट आहे. याद्वारे पक्षकार आणि वकिलांना खटल्याची माहिती आणि न्यायालयीन सेवा सहजपणे मिळण्यासाठी मदत होईल. ‘न्यायालयाची खटला व्यवस्थापन प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रथमच संपूर्ण माहिती एकत्रित केली जाईल’, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.









