‘टीव्हीके’च्या पाठिंब्यावरून अण्णाद्रमुकमध्ये फूट

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अण्णाद्रमुकमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सत्ताधारी टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून आमदारांमध्ये फूट पडली आहे. काही आमदारांनी पक्षाचे नेते एडाप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षांतर्गत मतभेद वाढत असून नेतृत्वबदलाची मागणी जोर धरत आहे.

‘टीव्हीके’च्या पाठिंब्यावरून अण्णाद्रमुकमध्ये फूट

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी पडलेल्या अण्णाद्रमुकच्या आमदारांमध्ये सत्ताधारी तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर फूट पडली आहे. पक्षाचे प्रमुख एडाप्पाडी के. पलानीस्वामी यांच्याविरोधात बंडखोरी करण्याचे संकेतही दिसत आहेत.

राज्य विधानसभेच्या एकूण २३४पैकी १६७ जागा लढवणाऱ्या अण्णाद्रमुकला केवळ ४७ जागांवर विजय मिळवता आला. निवडणुकीच्या निकालानंतर पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांच्या अनेक बैठका पार पडल्या. यामध्ये पक्षाच्या एका गटाने ‘टीव्हीके’ला समर्थन देण्यास तीव्र विरोध केला, तर दुसऱ्या गटाने बाहेरून पाठिंबा दर्शवण्यास सहमती दर्शवली. काही आमदारांनी निवडणुकीतील वाईट कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पलानीस्वामी यांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली.

सी. वे. शणमुगम आणि एस. पी. वेलुमणी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री व त्यांच्या समर्थक आमदारांनी पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकांमध्ये सहभाग घेतला नाही. ‘टीव्हीके’ला बाहेरून पाठिंबा देण्याकडे या नेत्यांचा कल आहे. ‘पक्षांतर्गत स्पष्ट मतभेद आहेत. अनेक आमदारांना नेतृत्वबदल हवा आहे. पलानीस्वामी यांच्याकडेच नेतृत्व कायम राहिले, तर काही आमदार ‘टीव्हीके’ला समर्थन देण्याची शक्यता आहे,’ असे अण्णाद्रमुकचे माजी नेते के. सी. पलानीसामी यांनी स्पष्ट केले.