‘‘त्या’ गुन्ह्यांचा जलद तपास करा’

महाराष्ट्र टाइम्स

शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी तातडीची बैठक घेतली. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई होणार आहे. अवैध धंदे बंद करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस दलाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यावर भर दिला आहे.

‘‘त्या’ गुन्ह्यांचा जलद तपास करा’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शहरात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वरिष्ठ अधिकारी आणि सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन कठोर सूचना दिल्या. महिला अत्याचाराशी संबंधित गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपींविरुद्ध तातडीने दोषारोपपत्र दाखल करावे, असे आदेश त्यांनी दिले; तसेच महिलांवरील अत्याचाराचे दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या.

नसरापूर येथील अत्याचारप्रकरणानंतर शहरात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या सलग घटना समोर आल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बलात्कार, विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे वाढते गुन्हे गांभीर्याने घेऊन त्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. तपास रखडू न देता संबंधित प्रकरणांमध्ये वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देश पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले.

गेल्या काही दिवसांत उघडकीस आलेल्या लाचखोरीच्या घटनांवरूनही आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. ‘अशा घटना वारंवार का घडत आहेत,’ असा थेट सवाल करून त्यांनी अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. पोलिस दलात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करीत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले.

शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करण्याच्या सूचनाही पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या वेळी दिल्या. संबंधितांवर कठोर कारवाई करून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर देण्यात आला. पोलिस दलाची प्रतिमा स्वच्छ, पारदर्शक आणि विश्वासार्ह राखण्यासाठी शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.