ड्रोनद्वारे आता आगीची अचूक माहिती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आता ड्रोन आगीची अचूक माहिती देईल. आगीचा कॉल येताच ड्रोन घटनास्थळी पोहोचेल. तेथील चित्रीकरण आणि आगीचा प्रकार, तीव्रता यासारखी माहिती अग्निशामक दलाला मिळेल. यामुळे आग विझवणे अधिक सोपे होणार आहे. ड्रोन ३६० अंशांमधून निरीक्षण करेल. या तंत्रज्ञानाच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. लवकरच हे तंत्रज्ञान अग्निशामक दलात वापरले जाईल.

accurate fire information via drones a revolutionary tool for firefighters

 पान १ वरून

आगीची वर्दी देणारा कॉल रेकॉर्ड होईल. त्यानुसार संबंधित ठिकाणी हा स्वयंचलित ड्रोन आपोआप जवळचा मार्ग शोधून आगीच्या ठिकाणी रवाना होईल. काही मिनिटांत आगीच्या ठिकाणी पोहोचून तिथले चित्रण (फुटेज) अग्निशामक दलाला पाठवण्यास सुरुवात करील; तसेच आगीची प्रकार, तीव्रता, आग लागलेल्या जागेची उंची, त्यानुसार आवश्यक आगीचा बंब, शिडीची उंची आदी माहितीही कळवील. ही माहिती अग्निशामक केंद्रासह अग्निशामक वाहनामध्ये बसवलेल्या स्क्रिनवरही दिसत राहील. त्याचबरोबर तेथील वाहतुकीचा अंदाज घेऊन आगीच्या बंबाच्या आकारानुसार घटनास्थळी पोहोचण्याचा सर्वांत जवळचा मार्गही हा ड्रोन दाखवत राहील. त्यानुसार अग्निशामक दलाला आवश्यक सामुग्रीसह जागेवर पोहोचून आग नियंत्रणात आणणे सोपे होईल.

या शिवाय या ड्रोन ३६० अंशांमधून आगीचे निरीक्षण करील. त्यानुसार ही आग लाकडाला लागली आहे, घातक रसायनाने पेट घेतला आहे, वायू पसरून आग लागली आहे किंवा आग कितपत भडकण्याची शक्यता आहे याचा अंदाज घेऊन हा ड्रोन त्याची माहिती कळवत राहील. त्यानुसार या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नेमकी कोणती साधने आवश्यक आहेत, याचा अचूक अंदाज येईल.

‘काही भागात नियंत्रित आग लावून या ड्रोनच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्या यशस्वी ठरल्या. अग्निशामक दलाकडून त्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. आमचा एक प्रशिक्षित कर्मचारी प्रत्येक केंद्रावर असेल; तसेच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत प्रशिक्षित केले जाईल,’ असे ‘आयसीसीसी’चे व्यवस्थापन करणाऱ्या ‘इनोव्हर सिस्टीम्स’चे संचालक अनिकेत जगताप यांनी सांगितले.