एसटी बस उलटून दोन जणांचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर गुंजाळवाडी येथे भीषण अपघात झाला. समोरून आलेल्या वाहनाला वाचवताना एसटी बस उलटली. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २६ जण जखमी झाले आहेत. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसचे मोठे नुकसान झाले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

एसटी बस उलटून दोन जणांचा मृत्यू
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

समोरून आलेल्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली . या अपघातात दोन जण ठार, तर २६ जण जखमी झाले. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर गुंजाळवाडी येथे हा अपघात झाला.

भिवंडी आगाराची शेगाव-कल्याण बस कल्याणला जात होती. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गुंजाळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत ही बस आली. त्या वेळी समोरून आलेल्या अज्ञात वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस दोन-तीन वेळा उलटून रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात जाऊन पडली.

या अपघातात दोन जण ठार झाले. त्यांची नावे स्पष्ट झालेली नाहीत. कोंडीभाऊ कारभारी वाकचौरे (वय ७०), कमल कोंडीभाऊ वाकचौरे (वय ६७, दोघे रा. बेल्हे), शंकर शिवाजी शेजाळ (वय ५०), वैशाली शंकर शेजाळ (वय २३, दोघे रा. देवडे पंढरपूर), मगन सुखदेव पाटोळे (वय ४८), शोभा मगन पाटोळे (वय ३०, दोघे रा. बुलढाणा), शारदा बन्सी मेंगळे (वय ५९, रा. आणे), अश्विनी गणेश बहिरट (वय ४८, रा. आणे), अलका नामदेव गायकवाड (वय ५८, रा. संगमनेर), अरुण शंकर गुंजाळ (वय ५१, रा. बेल्हे), दीपाली बबन डोंगरे (वय ३३, रा. डोंगरवाडी), उल्हास तांबे (वय ७०, रा. ओतूर), यमुना यादव पावसे (वय ६०, रा. हिवरगाव पावसा संगमनेर), दिव्या संजय पवार (वय २१, रा. मानवडी, सिन्नर), सिद्धेश नितीन काळे (वय १०), आशा नितीन काळे (वय ३५), नितीन सिद्धार्थ काळे (वय ३८, सर्व रा. पाथर्डी) हे जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन, सर्व जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले. जखमींना बाहेर काढण्यासाठी बस सरळ करण्यासाठी क्रेन आणावी लागली. आळेफाटा पोलिस पुढील तपास करीत आहेत.