अभिनेत्री उषा चव्हाण यांना दिलासा

महाराष्ट्र टाइम्स

अभिनेत्री उषा चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे. पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआर व्यवहाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. उषा चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना केली होती. या प्रकरणी आता स्वतंत्र सुनावणी घेतली जाणार आहे. यामुळे उषा चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे.

legal aid granted to usha chavan pune municipal corporation issues stay

पुणे : ‘धनकवडी येथील संबंधित जागा मी आणि माझ्या तीन बहिणींच्या नावावर होती. संपूर्ण मालमता १९८८पासून पुणे महापालिकेच्या मालकीची असून, त्यांच्या ताब्यात आहे. उषा चव्हाण या माझे दिवंगत वडील दत्तात्रय कडू यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार चव्हाण यांना या जागेत कोणतेही कायदेशीर हक्क नाहीत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने हस्तांतरणीय विकास हक्क ( टीडीआर ) मंजूर केला. यानुसार चव्हाण आणि त्यांचे चिरंजीव हृदयनाथ कडू यांना मालमत्ता हक्क उरलेले नाहीत,’ असे सुरेंद्र कडू म्हणाले.

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआरबाबत पुणे महापालिकेच्या व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत.

अभिनेत्री उषा चव्हाण यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करणारा एक व्हिडिओ समाज माध्यमावर टाकला होता; तसेच या प्रकरणी न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने उषा चव्हाण या रविवारी ठाण्यातील टेंभी नाका येथील ‘आनंदआश्रमा’त आल्या. त्यांनी अभिनेते, निर्माते मंगेश देसाई यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून, पुणे महापालिकेने केलेल्या या टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती द्यावी, असे निर्देश दिले; तसेच दोन्ही पक्ष आणि विकासक, तसेच पुणे महापालिका यांची स्वतंत्र सुनावणी आपल्यासमोर घेण्यात यावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले. या वेळी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते.