ठाणे : शहापूर तालुक्यातील डोळखांब वन परीक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून हल्ले करीत असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वन विभाग ाला यश आले. वन विभागाच्या या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी सोमवारी श्रमजीवी संघटनेने डोळखांब वन विभाग कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र, आता मोर्चाऐवजी ग्रामस्थ आनंदोत्सव साजरा करणार आहेत.
तरुणीचा मृत्यू
मुंबई : खार पश्चिमेतील गजबजलेल्या लिंकिंग रोडवर गेल्या रविवारी सायंकाळी एक मोठे झाड अचानक कोसळून रिक्षावर आदळल्याने दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेतील १४ वर्षीय आरिका श्रीवास्तव हिला रविवारी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मृत घोषित करण्यात आले. हर्षिता कुमार (वय २३) हिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. संबंधित विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष रेल्वे फेऱ्या
मुंबई : उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने १० विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. पनवेलहून सावंतवाडी रोडसाठी आठ आणि मडगावसाठी दोन फेऱ्यांचा यात समावेश आहे. यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दरवाढीचा निषेध
सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. इंधन दरवाढ, नीट पेपरफुटीचे प्रकरण या मुद्द्यांवरून हा मोर्चा काढण्यात आला. खासदार प्रणिती शिंदेंची पालकमंत्र्यांनी माफी मागावी यासाठी थाळीनाद करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना भाजप कार्यालयासमोर रोखून ताब्यात घेतले.
नगरसेविकेवर गुन्हा
मुंबई : मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश कोपरकर यांच्या पत्नी व भांडुपच्या प्रभाग ११०च्या नगरसेविका आशा कोपरकर यांच्याविरोधात भांडुप पोलिसांनी खंडणी, अपहरण, मारहाण या गंभीर कलमांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात कोपरकर यांचा मुलगा सर्वेश, मुली अक्षता व मनस्वी, जावई कुणाल भोईर यांनाही आरोपी करण्यात आले आहे. ५६ वर्षीय फॅशन डिझायनर महिलेने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
दोन मुलांचा मृत्यू
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप नाईकनगर तांडा येथे शेततळ्यात बुडून समर्थ मोहन चव्हाण (वय १२) आणि ओंकार रमेश चव्हाण (वय १०) या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते. दुपारी चारच्या सुमारास शेततळ्यात पोहायला उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.
‘अहवाल बदलला’
सांगली : ‘विसापूर आणि येळावी सर्कलमध्ये २२ एप्रिलला झालेल्या पावसाचा अहवाल विमा कंपनी आणि कृषी सहायकाने मिलीभगत करून बदलला आहे. प्रत्यक्षात ५१ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला असताना, तो कमी दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे,’ असा आरोप माजी खासदार संजय पाटील यांनी रविवारी केला. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.
कामगारांचा मृत्यू
नागपूर : बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील शनिवारी सांडपाण्याच्या चेंबरमध्ये साफसफाईसाठी उतरलेल्या प्रशांत मनुजे आणि राहुल मडावी या दोन कंत्राटी कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. सुरेश पाटेकर या कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी कंत्राटदार गौरव पुरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.









