ख्रिस्तायानो रोनाल्डो खेळत असलेला अल् नासर संघ आशियाई चॅम्पियन्स फुटबॉल लीगच्या अंतिम सामन्यात गॅम्बा ओसाकाविरुद्ध शनिवारी रात्री ०-१ असा पराभूत झाला. त्यानंतर रोनाल्डोने उपविजेतेपदाचे पदक स्वीकारणे टाळले.
रोनाल्डोला करारबद्ध केल्यापासून ‘अल् नासर’ने एकही प्रमुख स्पर्धा जिंकलेली नाही. अंतिम सामना संपल्याची शिट्टी झाल्यावर प्रतिस्पर्धी संघातील बक्षीस समारंभासाठी एकत्र येत होते. त्याच वेळी रोनाल्डोने त्याच्या अल् नासर संघातील सहकाऱ्यांसह न थांबता मैदान सोडले. अल् नासर संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉर्ज जेझस यांच्या नेतृत्वाखाली संघातील खेळाडूंनी उपविजेतेपदाचे पदक स्वीकारले. त्या वेळी रोनाल्डो त्यांच्यासह नव्हता. ‘अल् नासर’च्या सौदी अव्वल लीगच्या विजेतेपदाच्या आशा अजूनही कायम आहेत. त्यांची आता ‘दॅमाक’विरुद्ध लढत आहे. हा संघ अव्वल श्रेणीतील स्थान राखण्यासाठी संघर्ष करीत आहे. आता हे विजेतेपद जिंकल्यास रोनाल्डो २०२३मध्ये संघात दाखल झाल्यापासूनचे ‘अल् नासर’चे हे पहिलेच विजेतेपद असेल. आशियाई चॅम्पियन्स लीग सामन्यावर रोनाल्डोच्या अल् नासर संघाचेच वर्चस्व होते. मात्र, गॅम्बा ओसाकाचा गोल ते रोखू शकले नाहीत. हीच बाब निर्णायक ठरली. पूर्वार्धात आणि उत्तरार्धात ‘अल् नासर’कडून गोलची संधी थोडक्यात दवडली गेली. उत्तरार्धातील भरपाई वेळेत रोनाल्डोची किक गोलपोस्टजवळून गेली.






