विजेतेपदाचा दुष्काळ कायम

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेते ठरले. इंडोनेशियाच्या जोडीकडून अंतिम लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला. २०२४ मे पासून सुरू असलेला विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला. मात्र, खेळाडूंचा आत्मविश्वास वाढत असून लवकरच विजेतेपद मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खेळातील प्रगती समाधानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.

विजेतेपदाचा दुष्काळ कायम

इतिहास साथ देणारा होता; पण नशीब पूर्ण साथ देणारे नव्हते, याचाच अनुभव जणू सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी - चिराग शेट्टी यांना थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील रविवारी झालेल्या अंतिम लढतीत आला. बँकॉक झालेल्या निर्णायक लढतीत त्यांना इंडोनेशियाच्या जोडीविरुद्ध दोन गेममध्येच हार पत्करावी लागली. त्यामुळे त्यांना २०२४च्या मेपासून सुरू असलेला आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा दुष्काळ संपवता आला नाही.

लिओ रॉली कोरनॅडो आणि डॅनियल मार्टिन या इंडोनेशियाच्या जोडीने सात्त्विक-चिरागविरुद्धच्या यापूर्वीच्या चारही लढती गमावल्या होत्या. मार्टिन या वर्षात प्रथमच स्पर्धांत खेळत होता. मार्टिन-कोरनॅडोची दोन वर्षांतील ही पहिलीच स्पर्धा होती. मात्र, त्यांच्याविरुद्ध सात्त्विक-चिरागला १२-२१, २३-२५ अशा पराभवास सामोरे जावे लागले. पहिल्या गेममध्ये मार्टिनने बेसलाईनवरुन केलेले स्मॅश परतवणे भारतीयांच्या आवाक्याबाहेरचे होते. हे कमीच की काय म्हणून भारतीयांकडून चुराही जास्त झाल्या.

अगदी नेमके सांगायचे तर यातून पहिल्या गेमचे नेमके चित्र मांडले जात नाही. या पहिल्या गेमच्यावेळी ड्रिफ्टचा (कोर्टवरील वातानुकुलीत यंत्रणेतून वहात असलेल्या वाऱ्याचा) खूपच फायदा इंडोनेशियाच्या जोडीस मिळाला. त्यामुळे भारतीयांच्या दिशेने शटल जरा जास्तच वेगाने येत होते. त्यातच प्रतिस्पर्धीही नवीन होते. त्याचा परिणाम भारतीयांच्या खेळावर झाला. ‘या गेममध्ये शटल कमालीच्या वेगाने येत होते. या स्पर्धेत आम्ही हे कधीही अनुभवले नव्हते. त्यातच ते कमालीचे आक्रमक होत. त्यामुळे आव्हान देणेही पहिल्या गेममध्ये अवघड झाले,’ याकडे सात्त्विकने लक्ष वेधले. कोर्ट आम्हाला प्रतिकुल होते. त्यामुळे लय गवसली नाही. त्यांच्या स्टाईलनुसार खेळ करण्यास त्यांनी आम्हाला भाग पाडले. दुसऱ्या गेमपासून आम्ही व्यूहरचना बदलली. मात्र लय उशिरा गवसली. ती थोडी लवकर गवसली असती तर दुसरा गेम जिंकलो असतो, असेही तो म्हणाला.

सामन्याच्या सुरुवातीस झालेल्या नेटजवळील चकमकीत भारतीय कमी पडले आणि त्यांना १-४ अशा पिछाडीस सामोरे जावे लागले. भारतीयांनी सावरत पिछाडी ७-९ अशी कमी केली. याच सुमारास मार्टिनचे स्मॅश प्रभावी ठरू लागले. थायलंडच्या जोडीकडून होत असलेल्या चुकांमुळे भारतीय आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र काही वेळातच पिछाडी वाढत गेली.

दुसऱ्या गेममध्ये चिरागचा खेळ ऊंचावला. त्यामुळे ३-५ पिछाडीवरून भारतीयांनी ७-५ आघाडी घेतली. मात्र काही वेळातच कमालीची चुरस सुरू झाली. चिरागची फ्लीक सर्व्हिस लक्ष्य होण्यास सुरूवात झाली, मात्र त्याचवेळी भारतीय नेटजवळ प्रभावी ठरू लागले. १४-१४, १९-१९ अशी चुरस होती. भारतीयांनी चार मॅच पॉईंट वाचवले, पण अखेर ते हार टाळू शकले नाहीत.

मुंबई : थायलंड ओपन स्पर्धेत सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, आपली कामगिरी ऊंचावत आहे. त्यामुळे आत्मविश्वासही गवसत आहे, अशी भावना चिराग शेट्टीने व्यक्त केली. या वर्षाच्या सुरुवातीस आमची कामगिरी चांगली होत नव्हती. मात्र आता थॉमस कप स्पर्धेत ब्राँझ पदक जिंकले. आता उपविजेते झालो. विजेतेपदही लवकरच गवसेल हा आम्हाला नक्कीच विश्वास आहे, असे चिरागने सांगितले. त्याचवेळी त्याने या स्पर्धेतील कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले. या स्पर्धेच्यावेळी आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने खेळलो नाही, हे नक्कीच म्हणता येईल. तो आत्मविश्वास परत येत आहे. आमच्या प्रशिक्षकांना खेळात प्रगती दिसत आहे. आज आम्ही हरलो असू, पण काही आठवड्यात यशस्वी नक्कीच होणार, अशी पुस्ती सात्त्विकने जोडली. अंतिम सामन्यात जिंकण्याचा आम्हाला पूर्ण विश्वास वाटत नव्हता. एक-दोन वर्षापूर्वी आपण नक्कीच जिंकणार हा विश्वास असे. ही परिस्थिती नक्कीच बदलायला हवी. यशामुळे ती बदलण्यास सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत नक्कीच चांगला खेळ झाला. आमच्या शारीरीक तसेच मानसिक क्षमतेचा कस लागला, पण त्यातून आम्ही बाहेर पडलो, असेही त्यांनी सांगितले.