उष्णतेच्या लाटांचा तडाखा

महाराष्ट्र टाइम्स

राज्यात उष्णतेच्या लाटांनी थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाच आता उन्हाचा तडाखा बसत आहे. अकोला आणि वर्धा येथे सर्वाधिक ४६ अंश तापमान नोंदवले गेले. धरणांमधील पाणीसाठाही चिंताजनक स्थितीत आहे.

उष्णतेच्या लाटांचा तडाखा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे सामान्य शेतकऱ्यांना फटका बसलेला असतानाच, उष्णतेच्या लाटांचा तडाखा अनेक जिल्ह्यांना बसत आहे. आपत्ती व व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील २२ जिल्हे आणि १८३ तालुक्यांतील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पलीकडे पोहोचले आहे. गेल्याच आठवड्यात हा ‘ताप’ केवळ सहा जिल्हे आणि २१ तालुक्यांपुरता मर्यादित होता.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात सादरीकरण करण्यात आले. यात राज्यभरातील तापमानाची बदलती स्थिती, अवकाळी पाऊस आणि वीज कोसळून झालेल्या जीवितहानीबाबत सादरीकरण करण्यात आले. पाच ते १४ मे या कालावधीत सात मे रोजीचा एकमेव अपवाद वगळता दररोज विविध तालुक्यांतील पारा वाढून ४५ अंशांच्या पुढे जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ११ मे रोजी १६ जिल्ह्यांतील ५१ तालुक्यांत तापमान ४५ अंशांपलीकडे होते. त्यापुढील दोन दिवसांत १०६ आणि १८३ तालुक्यांतील तापमान ४५च्या पुढे गेले. राज्यात रविवारी अकोला येथे कमाल तापमान ४६ अंश नोंदवले गेले. वर्धा येथेही कमाल तापमान ४६ अंश होते. अमरावती येथे ४५.८, परभणी येथे ४५.२ इतके कमाल तापमान होते.

दरम्यान, जलसंपदा विभागानेही पाणीसाठ्याबाबत सादरीकरण केले. त्यानुसार राज्यातील सहा महसुली विभागातील एकूण तीन हजार २८ धरणांत ५०३.७६ टीएमसी, म्हणजेच क्षमतेच्या ३५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.