टोमॅटो, काकडी, आल्याचे दर वाढले

महाराष्ट्र टाइम्स

पुणे मार्केट यार्डात फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. टोमॅटो, काकडी आणि आल्याचे दर वाढले आहेत. उन्हामुळे पालेभाज्यांचे उत्पादन घटल्याने कोथिंबीर आणि मेथीचे दरही वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. फुलबाजारात शोभिवंत फुलांची आवक जास्त असूनही मागणी कमी असल्याने दरात घट झाली आहे.

टोमॅटो, काकडी, आल्याचे दर वाढले
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मार्केट यार्डातील फुलबाजारात सुट्या फुलांसह शोभिवंत फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, सध्या फुलांना मागणी कमी असल्याने शोभिवंत फुलांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ८०-१२०, ॲस्टर : जुडी १०-२०, सुट्टा १००-१५०, कापरी : २०-५०, शेवंती : ५०-१३०, गुलाबगड्डी (गड्डीचे दर) : २०-३०, गुलछडी काडी : २०-८०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जर्बेरा : ३०-५०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) १०००-१५००, ऑर्किड ५००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१३०, जिप्सोफिला : १६०-३००, लिली बंडल : ५-६, मोगरा : २००-३००.

उन्हाच्या तीव्रतेचा फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने घाऊक बाजारात आवक कमी होत आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने आले, टोमॅटो, काकडी आणि घेवड्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उन्हामुळे पालेभाज्यांचे उत्पादन घटल्याने कोथिंबीर आणि मेथीचे दर पुन्हा वाढले आहेत. घाऊक बाजारात दोन्ही पालेभाज्यांच्या दरात शेकडा गड्डीमागे ५०० ते १००० रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असल्याने भाजीपाल्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरचीची आवक झाली. आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी पाच टेम्पो, कर्नाटक येथून कोबी तीन ते चार टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा तीन ते चार टेम्पो, कर्नाटकातून घेवडा दोन टेम्पो, हिमाचल येथून मटार सात ते आठ टेम्पो आवक झाली. मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो; तर इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाटा ४० टेम्पो इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४५० गोणी, भेंडी सहा ते सात टेम्पो, गवार तीन ते चार टेम्पो, टोमॅटो आठ हजार क्रेट, काकडी सात टेम्पो, फ्लॉवर १० ते १२, कोबी पाच ते सहा टेम्पो, ढोबळी मिरची आठ ते १० टेम्पो, गाजर आठ ते १० टेम्पो आवक झाली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे ९० हजार जुडी, मेथीची ३५ हजार जुड्यांची आवक झाल्याचे ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.