वाळूज महानगर : एएस क्लब चौकाजवळ एका धावत्या दुचाकीला आग लागल्याने क्षणार्धात जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या वेळी दुचाकीला आग लागल्याचे एका वाहनधारकाच्या लक्षात आल्याने त्याने दुचाकीस्वाराला आवाज देऊन थांबण्याची सूचना केल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला.
अभिषेक गणेश जंघाले (वय २२, रा. टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर) हा तरुण महाविद्यालयीन कामासाठी दुचाकीवरून वाळूजकडे येत होता. त्या वेळी साउथ सिटीजवळ आला असता दुचाकी नादुरुस्त झाली. त्या वेळी तेथील एका गॅरेजवर ती दुरुस्त करून घेतली. त्यानंतर एएस क्लब चौकातून यू-टर्न घेऊन घराकडे परत जात असताना पाठीमागून एका वाहनचालकाने आवाज देऊन दुचाकीला आग लागल्याचे ओरडून सांगितले. त्या वेळी अभिषेक यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करून दूर झाले असता काही वेळातच आगीचा भडका उडाला.






