वाळूज महानगर : देशभरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सोशल मीडियावर प्रतिसाद दिलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके वाळूज महानगर येथील रहिवासी असून, परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. काही दिवसापासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीला समाजमाध्यमांवर मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद बघून सगळीकडे दिपके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
सिडको वाळूज महानगर येथील रहिवासी, एमआयडीसीचे निवृत्त उपअभियंता भगवान दिपके यांचा मुलगा अभिजित यांचे सुरवातीचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले आहे. ते सध्या अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी नावाने समाजमाध्यमावर खाते उघडले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक पक्षांच्या फॉलोअर्सपेक्षा त्यांना कमी कालावधीतच चांगल्या संख्येने फॉलोअर्स मिळाल्याने अचानक त्यांचे नाव चर्चेत आले असून, वाळूज परिसरात फक्त कॉक्रोच पार्टीचीच चर्चा सुरू आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करून त्याचा जाहीरनामा समाजमाध्यमांवर आल्यापासून दिपके देशभरात चर्चेत आले आहेत. या वेळी त्यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यात महिलांना पन्नास टक्के आरक्षण, पक्षांतर करणाऱ्यांवर वीस वर्षांची बंदी, मतदानाचा हक्क हिरावल्यास कठोर कारवाई आदी मुद्दे मांडले आहेत. या सर्व मुद्द्यांना देशभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, वाळूज महानगर परिसरातही त्यांच्या नावाचीच चर्चा सुरू असून, सर्वत्र कौतुक केले जात आहे.






