‘यूके’मधील स्थलांतर घटले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

यूकेमधून बाहेर जाणाऱ्यांमध्ये भारतीय विद्यार्थी आणि कामगार सर्वाधिक आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यूकेमधील निव्वळ स्थलांतरितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यूकेच्या गृहमंत्री शबाना महमूद यांनी सीमा नियंत्रणावर भर दिला आहे. कौशल्य-आधारित स्थलांतर प्रणाली आणली जात आहे. आरोग्य आणि कुशल कामगार व्हिसा विस्तारातही भारतीय आघाडीवर आहेत. विद्यार्थ्यांमध्येही भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे.

‘यूके’मधील स्थलांतर घटले

यूकेमधून बाहेर पडणाऱ्यांच्या अर्थात स्थलांतर करणाऱ्यांच्या यादीत भारतीय विद्यार्थी आणि कामगार आघाडीवर आहेत. मात्र गुरुवारी लंडनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या निव्वळ स्थलांतरितांच्या आकडेवारीत यंदा लक्षणीय घट नोंदवण्यात आली असून, मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या जवळपास निम्म्यावर आली आहे.

‘ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स’च्या (ओएनएस) गेल्या (२०२५) वर्षासाठी केलेल्या विश्लेषणानुसार, अभ्यासासाठी आलेले सुमारे ५१ हजार भारतीय, कामासाठी आलेले २१ हजार आणि इतर कारणांसाठी आलेले तीन हजार भारतीय देश (यूके) सोडून बाहेर जाण्यात आघाडीवर होते. त्यांच्यानंतर चिनी विद्यार्थी आणि कामगार (४६ हजार) यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर युक्रेनियन (१८ हजार), पाकिस्तानी आणि नायजेरियन (प्रत्येकी १९ हजार) हे स्थलांतर करणाऱ्या नागरिकांमध्ये पहिल्या पाचमध्ये आहे. त्यामुळे गेल्या वर्षी एकूण निव्वळ स्थलांतर १.७१ लाखांवर आले आहे.

‘हे सरकार आपल्या सीमांवर सुव्यवस्था आणि नियंत्रण पुन्हा मिळवत आहे. या देशात योगदान देणाऱ्यांचे आणि येथे चांगले जीवन घडवू इच्छिणाऱ्यांचे आम्ही नेहमीच स्वागत करू. परंतु आपल्या सीमांवर सुव्यवस्था आणि नियंत्रण पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे. या आकडेवारीतून दिसते की, खरी प्रगती झाली आहे, मात्र अजून बरेच काम बाकी आहे. म्हणूनच मी एक कौशल्य-आधारित स्थलांतर प्रणाली आणत आहे. ती योगदानाला पुरस्कृत करेल आणि ब्रिटनचे स्वस्त परदेशी कामगारांवरील अवलंबित्व संपवेल,’ असे यूकेच्या गृहमंत्री शबाना महमूद म्हणाल्या.

भारतीय आघाडीवर

या वर्षी मार्चअखेर संपलेल्या वर्षात ‘हेल्थ अँड केअर वर्कर व्हिसा’ विस्तारांची सर्वाधिक संख्या भारतीयांची (१,०७,३०६) आहे. त्यानंतर नायजेरियन (८९,५७५) आणि झिम्बाब्वेच्या (३१,११७) नागरिकांचा क्रमांक लागतो. त्याचप्रमाणे, कुशल कामगारांमध्येही भारतीय (८९,८५१) आघाडीवर आहेत, त्यानंतर पाकिस्तानी (१६,६०७) आणि नायजेरियन (१३,४०९) नागरिक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये, ग्रॅज्युएट रूट व्हिसा विस्तार सर्वाधिक भारतीयांना (७०,३७१) देण्यात आले आणि यूकेसाठी स्पॉन्सर्ड स्टडी व्हिसा मंजूर होणाऱ्यांमध्येही भारतीय ९०,४२५सह अग्रस्थानी राहिले.