माहेश्वरी सभेचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लातूर येथे जिल्हा माहेश्वरी सभेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. नूतन पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. माजी प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. महेशपूजन व महेशवंदना सादर करण्यात आली. नूतन अध्यक्षांनी समाजाच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही दिली.

माहेश्वरी सभेचा पदग्रहण सोहळा उत्साहात

लातूर : जिल्हा माहेश्वरी सभेच्या नूतन कार्यकारिणीची निवड झाली. ‘जिल्हा माहेश्वरी सभेच्या नूतन कार्यकारिणीने माहेश्वरी समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे,’ असे आवाहन सभेचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी केले.

या कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, महिला संघटनच्या प्रदेश सचिव अनिता मालू, जिल्हा माहेश्वरी सभेचे नूतन अध्यक्ष सीए प्रकाश कासट, प्रदेशचे जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश तापडिया यांच्यासह नवनिर्वाचित सचिव राजेश मंत्री व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. हरिप्रसाद सोमाणी, बालकिशन मुंदडा, गोविंद कोठारी, फुलचंद काबरा, गोकुळदास चांडक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांनी महेशपूजन केले. यानंतर हनुमान रांदड यांनी महेशवंदना सादर केली.

महाराष्ट्रात माहेश्वरी समाज मोठ्या प्रमाणात असून, या समाजाने राज्याच्या विकासात व प्रगतीत आपले योगदान नेहमीच दिले असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष गांधी म्हणाले, की लातूर जिल्ह्यातील माहेश्वरी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मतभेद व मनभेद बाजूला ठेवून आगामी तीन वर्षे समाजहितासाठी कार्यरत रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून समाजातील युवकांना दिशा देण्यात काम व्हावे, असे सांगून युवकांना समाजाची संस्कृती व संस्कार समजावून सांगून ते जोपासण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन केले. जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिल्याबद्दल समाजबांधवांचे आभार व्यक्त करून जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सीए कासट यांनी हे पद नसून, जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.

या प्रसंगी निवडणुक निर्णय अधिकारी हरिप्रसाद सोमाणी यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा केली. या वेळी प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा माहेश्वरी सभेतील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष सीए प्रकाश कासट यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून उपाध्यक्ष म्हणून लातूर येथील रामेश्वर पुनपाळे व उदगीरचे अशोक बाहेती यांची नियुक्ती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सोनी व ईश्वरप्रसाद बिदादा यांनी केले आणि आभार प्रदर्शन फुलचंद काबरा यांनी केले. कार्यक्रमासाठी लक्ष्मीरमण लाहोटी, रमेश राठी यांच्यासह लातूर शहर व जिल्ह्यातील माहेश्वरी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.