गेल्या काही वर्षांपासून विस्कळित पावसामुळे शेतीविषयीचे पारंपरिक आडाखे चुकत आहेत. या पावसाचा फटका शेतीप्रमाणेच शहरी भागालाही बसतो आहे. मान्सूनची ही अनिश्चितता गुंतवणुकीचे साधन म्हणून विकसित करत नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंजने (एनसीडीईएक्स) ‘ रेनमुंबई ’ हा वायदा व्यवहार बाजारात आणला आहे. हा वायदा वेदर डेरिव्हेटिव्ह या स्वरूपात सादर झाला असून, तो देशातील पहिला सेबी-मान्यताप्राप्त, एक्सचेंज-ट्रेडेड कॉन्ट्रॅक्ट आहे. याअंतर्गत प्रत्यक्ष व्यवहारांना २९ मेपासून सुरुवात होणार आहे.
हे डेरिव्हेटिव्ह मान्सूनच्या अनिश्चिततेला एका नियमन चौकटीत बसवत ही अनिश्चितता युनिटमध्ये मोजता येण्याजोग्या, व्यवस्थापन करता येण्याजोग्या आणि व्यापार करता येण्याजोग्या आर्थिक जोखमीत रूपांतरित करण्यासाठी तयार करण्यात आले आहे, असे एनसीडीईएक्सने म्हटले आहे.
रेनमुंबई वायदा विकसित करण्यासाठी एनसीडीईएक्सने आयआयटी मुंबईचे सहकार्य घेतले आहे. मुंबई परिसरातील पर्जन्यमानाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) घेतला जाणार आहे. रेनमुंबईमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना पावसातील चढउतारांमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक जोखमीचे हेजिंग करता येणार आहे. ‘रेनमुंबई’ मान्सून हंगामात मुंबईच्या पावसातील दीर्घकालीन सरासरीपासूनच्या फरकाचा मागोवा घेईल. एक मिमी पाऊस हे गुंतवणुकीचे एक युनिट असून त्याची किंमत ५० रुपये असेल. किमान ऑर्डर ५० लॉटची असेल.






