कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

महाराष्ट्र टाइम्स

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी जनगणना कामात हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. जे कर्मचारी रुजू होणार नाहीत, त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल. तसेच, संबंधित संस्थांनाही याबाबत माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले आहे. काही झोनमधील कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.

कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

जनगणनेच्या कामात अद्याप रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. या कर्मचाऱ्यांना रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत रुजू होण्यासाठी संधी देण्यात आली आहे.

जनगणना कामाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सहसंचालक वीरेंद्र दीक्षित यांच्या उपस्थितीत पर्यवेक्षक आणि चार्ज अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. ज्या कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के काम केले त्यांचा सत्कार या बैठकीत करण्यात आला. काही झोन मधील कर्मचारी अद्यापही रुजू झाले नाहीत असे आयुक्तांच्या लक्षात आले. प्रामुख्याने झोन क्रमांक १, २, ५, ९ येथील प्रगणक अद्याप रुजू झालेले नाहीत. हे प्रगणक रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत रुजू न झाल्यास त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करा , ते ज्या संस्थेत काम करतात त्या संस्थेला लेखीस्वरुपात याची माहिती द्या व या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना करा, असे ते म्हणाले.

झोन क्रमांक आठचे पर्यवेक्षक शेख समी हबीब , झोन क्रमांक तीन चे पर्यवेक्षक शेख अब्दुल रहीम व चार्ज अधिकारी यांच्या कामाचे कौतुक आयुक्तांनी केले. या दोन्हीही झोनचे काम पुढील आठ दिवसांत पूर्ण होईल अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. या वेळी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांनीदेखील मार्गदर्शन केले. सहसंचालक वीरेंद्र दीक्षित यांनी कामात येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय या बाबत उपस्थितांना माहिती दिल्याचे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.