निकाल लवकर घोषित झाल्याने हक्काच्या सुट्ट्या असूनही कनिष्ठ महाविद्यालयांतील अनेक शिक्षकांना आपल्या मूळ गावीदेखील जाता आलेले नाही. त्यामुळे सुट्ट्या नाही तर रजा रोखीकरण द्या, अशी मागणी पुढे आली आहे.
दहावी आणि बारावीचा निकाल लवकर जाहीर करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना त्यांच्या उन्हाळी सुट्यांना मुकावे लागले आहे. यंदा बारावीचा निकाल २ मे आणि आणि दहावीचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला. महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना शैक्षणिक वेळापत्रकानुसार १ मे ते १५ जून २०२६पर्यंत उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु, इयत्ता बारावीचा निकाल सुट्ट्यांच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २ मे रोजी जाहीर झाला आहे. तर इयत्ता दहावीचा निकाल हा ८ मे रोजी जाहीर झाला. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचा निकाल गुणपत्रिका वितरण, विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन, आणि इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया भाग एक विद्यार्थी नोंदणी याकरिता आपापल्या कनिष्ठ महाविद्यालयात थांबावे लागत आहे. अनेक ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने देखील विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याचे दाखले, दाखल खारीज उतारे देखील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना तयार करावे लागत आहेत. या सर्व प्रकारात २०१७ पासून पवित्र पोर्टलमार्फत महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यांत आणि मूळ गावापासून शेकडो किलोमीटरवर कार्यरत असलेल्या शिक्षकांची कोंडी झाली आहे. निकाल लवकर घोषित झाल्याने हक्काच्या सुट्ट्या असूनही अनेक शिक्षकांना आपल्या मूळ गावीदेखील जाता आलेले नाही. दहावी बारावीचा निकाल घोषित झाल्याबरोबर प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी या शिक्षकांना प्रवेश प्रक्रिये करिता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बोलावून घेतले आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश, जनगणना आणि मतदारयाद्यांचे पुनर्निरीक्षण यांमुळे कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना यंदा त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्या मिळालेल्या नाहीत. शिक्षण मंडळाने ऑनलाइन निकाल जाहीर केला. मात्र, अद्यापही विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिका शाळा महाविद्यालयांमध्ये पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांसाठी शाळा महाविद्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यांना समाधानकारक उत्तरे देण्याचे कामही शिक्षकांना करावे लागते आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपुष्टात आल्याने शिक्षकांच्याही इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अर्जित रजांचे रजा रोखीकरण करण्यात यावे. तसेच दिवाळीच्या सुट्ट्या एक महिना देण्यात याव्यात अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.







