एमआयडीसीने १७ ऑक्टोबर २०२५ रोजी लागू केलेल्या मिलाप भूखंड वाटप धोरणात आता बदल करून नव्या प्रवर्गाचा समावेश केला आहे. त्याअंतर्गत पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्क, अमरावती या नवीन प्रवर्गांतर्गत केवळ वस्त्रोद्योग आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित उपकरणे उत्पादन करणाऱ्या युनिट्सनाच अर्ज करता येईल. थेट पद्धतीचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर भू-वाटप समिती प्रस्तावित प्रकल्पाचे मूल्यांकन करेल. यामध्ये कंपनीची एकूण गुंतवणूक, नवीन व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, रोजगार निर्मितीची क्षमता, पर्यावरणीय शाश्वतता आणि राज्याच्या औद्योगिक धोरणाशी असलेली सुसंगतता या बाबी तपासूनच निर्णय घेतला जाईल. या समितीचा निर्णय सर्व अर्जदारांवर बंधनकारक असेल.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केंद्र सरकारच्या मंजुरीने अमरावती येथील नांदगावपेठ येथे उभारण्यात आलेल्या पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कमधील वस्त्रोद्योगांसाठी राखीव भूखंड आता थेट पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. औद्योगिकीकरणाला अधिक गती देण्यासाठी आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाद्वारे सांगण्यात येत आहे.
पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाने भूखंडाच्या दरांमध्ये मोठी सूट जाहीर केली आहे. येथे औद्योगिक भूखंडाचा नियमित दर १,२२१ रुपये प्रति चौरसमीटर निश्चित करण्यात आला असला, तरी ३० जून २०२६ पूर्वी अर्ज करणाऱ्या कंपन्यांना ५० टक्के सवलतीसह ५९० रुपये प्रति चौरसमीटर या सवलतीच्या दराने भूखंड वाटप केले जाणार आहे. पंतप्रधानांच्या ‘शेत ते फायबर ते कारखाना ते फॅशन ते परदेशी’ धोरणाला गती देण्यासाठी आणि अमरावतीला एक मोठा टेक्स्टाइल हब बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ई-निविदेची क्लिष्ट प्रक्रिया टाळून सरळ पद्धतीने अर्ज मागविल्यामुळे भूखंड वाटप अधिक सुलभ होईल आणि रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट लवकर साध्य करता येईल, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे. या टेक्स्टाइल पार्कमध्ये उद्योगांसाठी सर्व सोयींनी अद्ययावत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, सांडपाणी निचरा व क्रॉस ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लायटिंग आणि २४ तास पाणीपुरवठा, सौर पॉवर प्लान्ट आणि सामान्य स्टीम सुविधा, सीईटीपी आणि २ एमएलडी क्षमतेचा एसटीपी, कामगारांच्या राहण्याची सोय आणि प्रशिक्षण केंद्र, प्लग अँड प्ले युनिट्स आणि प्रशासकीय कार्यालय यांचा समावेश आहे.







