पेट्रोल पंपाची झाडाझडती

महाराष्ट्र टाइम्स

साजापूर येथील एका पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा असूनही वाटप बंद ठेवल्याची तक्रार पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे आली. त्यांनी पंपावर धाव घेत पाहणी केली. कर्मचाऱ्यांनी पंप बंद ठेवल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने तपासणी केली असता डिझेलचा साठा आढळला. पुढील कारवाई तेल कंपन्यांना कळविण्यात येईल.

पेट्रोल पंपाची झाडाझडती
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पालकमंत्री पंपावरून निघून जाताच थोड्या वेळाने कर्मचाऱ्यांनी पंप सुरू करत पेट्रोल सह डिझेल वाटप सुरू केले. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने दोनच्या सुमारास पंपास भेट दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी म्हणाले, ‘पालकमंत्र्यांच्या आदेशाने पथकाने पंपाची तपासणी केली. आम्ही तिथे पोचलो त्या वेळी पंप सुरू होता. डिझेलचा दोन हजार ३०० लिटरचा साठा आढळला. पंपावरील यंत्रणेप्रमाणे दोन हजार लिटरवर रिझर्व्ह (इंधन साठा) लागत असल्याचे दिसले. तीन हजार लिटर पेट्रोलचा साठा आढळला. साठा असूनही पंप बंद करणे चुकीचे आहे’. पुढील कारवाईबाबत लेखी स्वरुपात संबंधित तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. साजापूर परिसरातील अन्य तीन ते चार पंपांचीही पथकामार्फत तपासणी केल्याचे त्यांनी नमूद केले.

डिझेल दिले जात नसल्याबाबत तक्रार पाप्त होताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी साजापूर येथील एका पेट्रोल पंपावर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास धडक मारली. पालकमंत्री पंपावर पोचताच शेतकऱ्यांनी त्यांना ‘घेराओ’ घालत तक्रारीचा पाढा वाचला. पंप बंद असल्याने व जबाबदार कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने पालकमंत्र्यांनी यंत्रणेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत पालकमंत्र्यांनी पंपाची तपासणी करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने पंपाची तपासणी केली असता २३०० लिटर डिझेल साठा शिल्लक असल्याचे समोर आले. पंपचालकांविरोधात कारवाईबाबत संबंधित तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात कळविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी यांनी दिली.

साजापूर परिसरातील एका पंपावर साठा असूनही डिझेल दिले जात नसल्याची तक्रार पालकमंत्री शिरसाट यांना एका नागरिकाने केली. माहिती मिळताच पालकमंत्री पंपावर पोचले. पंप बंद होता तसेच तिथे माहिती देण्यासाठी जबाबदारी कर्मचारी उपस्थित नसल्याचे पाहून पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. उपस्थित शेतकरी, वाहनचालकांनी त्यांना घेराओ घालत डिझेल मिळत नसल्याबाबत व्यथा मांडली. साठा असूनही डिझेल दिले जात नाही, शिल्लक साठा किती ? याची माहिती दिली जात नसल्याच्या तक्रारी उपस्थितांनी केल्या. सर्वांना थोड्या फार प्रमाणात तरी डिझेल द्यावे, अशी मागणी केली. प्रतीक्षा करुनही पंपचालकांपैकी कोणीही न आल्याने पालकमंत्र्यांनी पंपाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरुन दिले. साठा शिल्लक असूनही वितरित न करणे, पंप बंद करणे हे चुकीचे असल्याचे पालकमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले.

जाणीवपूर्वक पंप बंद केले जातात. शेतकरी एका पंपावरून दुसऱ्या पंपावर जातो. तेथेही डिझेल मिळाले नाही तर तो त्रस्त होणारच. संताप व्यक्त करणारच. असे का घडते, याच्या मागील कारणे शोधावी लागतील. जाणून बुजून दिरंगाई करतात काय किंवा इतर ठिकाणी विकतात काय, याचा तपास करावा लागेल. साठा किती शिल्लक आहे, हे का दाखवत नाही? असा सवाल पालकमंत्री शिरसाट यांनी करुन जिल्हा प्रशासनास पंपाची तपासणीचे निर्देश दिले असून कुठेही चुकीचे आढळल्यास तेथे कारवाई होईल, असे त्यांनी नमूद केले.