‘नीट-यूजी २०२६’ प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात आता ‘गॉड’ नावाच्या व्हॉट्सॲप अकाउंटमुळे नव्या संशयाला तोंड फुटले आहे. अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांच्या पतीच्या मोबाइलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद चॅट केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) आढळून आले असून, प्रश्नपत्रिका फुटीचा खरा ‘गॉडफादर’ कोण, याचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे.
‘सीबीआय’ने सदाशिव पेठेतील मनीषा हवालदार यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात अनेक धक्कादायक पुरावे हाती लागले. तपासादरम्यान मनीषा हवालदार यांनी सहआरोपी मनीषा मांढरे यांच्यासोबतचे व्हॉट्सॲप चॅट डिलिट केल्याची कबुली दिली; तसेच भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नांच्या हस्तलिखित नोट्स जाळून टाकल्याचेही त्यांनी मान्य केल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी म्हटले असून, अन्य काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.
मात्र, तपासादरम्यान त्यांचे पती संजय हवालदार यांच्या मोबाइलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या मोबाइल क्रमांकाशी झालेला संवाद तपास यंत्रणांच्या हाती लागला. त्यानंतर ‘सेलेब्राइट प्रीमियम’ या फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मोबाइलचे डिजिटल एक्स्ट्रॅक्शन करण्यात आले. डिलिट करण्यात आलेल्या चॅटमधून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. चौकशीदरम्यान मनीषा हवालदार यांनी एप्रिल २०२६ मध्ये ‘नीट-यूजी’च्या भौतिकशास्त्र विषयातील प्रश्न काही विद्यार्थ्यांना आणि सहआरोपींना दिल्याचे मान्य केले आहे. हे प्रश्न व्हॉट्सॲप आणि प्रिंटआउटच्या माध्यमातून पुढे पाठवण्यात आले. शेठ हिरालाल सराफ प्रशालेतील अधिकृत संगणकावरून प्रश्नांचे प्रिंटआउट काढल्याची कबुलीही त्यांनी दिली.
सीबीआयच्या चौकशीत मनीषा हवालदार यांनी सुरुवातीला प्रश्नांच्या बदल्यात एका तरुणाकडून वीस हजार रुपये आणि एका महिलेकडून पंचवीस हजार रुपये रोख स्वरूपात घेतल्याचे सांगितले. ही रक्कम मनीषा मांढरे यांच्या उपस्थितीत मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, नंतर त्यांनी पैसे घेतले नाहीत, असे सांगितल्याचे सीबीआयने न्यायालयात दिलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये म्हटले आहे. झडतीदरम्यान घरातून एक लाख १९३० रुपये रोख सापडले, असेही त्यात नमूद आहे.







