गेल्या नऊ दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. शनिवारी (२३ मे) रोजी तिसऱ्या पेट्रोल आणि डिझेल दर वाढ जाहिर करण्यात आली. यंदा पेट्रोलच्या दरात ९० पैशांनी तर डिझेलच्या दरात ९४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे शहरात पेट्रोलचे दर ११०.१३ वर पोहोचले असून डिझेल दर ९६.६७ रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती याचा परिणाम हा इंधन पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑइलच्या दराचा हवाला देत, शासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यास सुरवात केली आहे. १५ मार्च रोजी इंधन दरवाढीस सुरवात करण्यात आली. १५ मे ला पेट्रोलच्या दरात तीन रुपये १५ पैशांची वाढ करण्यात आली. यानंतर १९ मार्चला ९१ पैसे आणि आता २३ मे रोजी पुन्हा ९० पैशांची पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. शहरात डिझेलच्या दरात १५ मे ला ३ रूपये १२ पैसे, १९ मे ला ९४ पैसे आणि २३ मे ला पुन्हा ९४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या तीनवेळेस झालेल्या दरामुळे गेल्या नऊ दिवसात पेट्रोलच्या दरात प्रती लिटर ४.१६ रुपये तर डिझेल पाच रुपयांची महाग झालेले आहे. आगामी काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
तिसऱ्यांदा शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत. दरवाढीचा निर्णय जाहिर झाल्यानंतर नागरिकांना डिझेल आणि पेट्रोल मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, दरवाढीनंतर शनिवारीही शहराच्या अनेक पंपावर डिझेल घेण्यासाठी आलेल्या चार चाकी आणि मोठी वाहने रांगेत उभी होती. यामुळे इंधनाचे दरवाढ जाहीर झाल्यानंतरही पंपावर इंधन वाहतुकीमध्ये मोठी अडचण अजूनही कायम असल्याची माहिती पंपचालकांकडून देण्यात आली.







