राजकारणामुळे उद्दिष्टांपासून फारकत

महाराष्ट्र टाइम्स

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. ताराचंद्र खांडेकर यांनी डॉ. रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी शरद पवार यांच्या राजकारणापासून दूर राहून घरकाम करणाऱ्या कामगारांसाठी कायदा करण्याचे ऐतिहासिक काम केले. त्यांच्या जीवनावरील 'बोधिपर्व' या गौरवग्रंथाचे प्रकाशन झाले. अरुणा सबाने यांनी हा ग्रंथ त्यांच्या संघर्षाचा दस्तावेज असल्याचे सांगितले. डॉ. श्रीकांत तिडके यांनी त्यांच्या मूल्यांशी तडजोड न करण्याच्या वृत्तीचा उल्लेख केला.

राजकारणामुळे उद्दिष्टांपासून फारकत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘महाराष्ट्रात शरद पवार ांनी अनेक विचारवंतांना हाताशी धरून राजकारण केले. त्याचा मोबदलाही अनेकांना मिळाला. मात्र, हे करत असताना साहित्यिक-विचारवंत भरकटत गेले आणि आपल्या उद्दिष्टांपासून फारकत घेत गेले. डॉ. रूपा कुलकर्णी- बोधी या मात्र शरद पवार यांच्या राजकीय सत्तेला कधीही भाळल्या नाहीत. घरकाम करणाऱ्या कामगारांसाठी कायदा करण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी करवून दाखवले. विचारपूर्वक स्वीकारलेला धम्मविचार त्यांनी कृतीतून आजवर टिकवला आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले.

संस्कृत विद्वान आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रूपा कुलकर्णी बोधी यांच्या जीवनावरील ‘बोधिपर्व’ या गौरवग्रंथांचे प्रकाशन शनिवारी विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात करण्यात आले. त्यावेळी डॉ. खांडेकर अध्यक्ष म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून लेखक डॉ. श्रीकांत तिडके, स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि प्रकाशक अरुणा सबाने, सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे, आंबेडकरी विचारवंत सीमा मेश्राम, भन्ते नागदीपंकर , ‘बोधिपर्व’चे प्रकाशक नरेश वाहणे मंचावर उपस्थित होते.

‘या गौरवग्रंथामुळे रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या अनेक आठवणी जागा झाल्या आहेत. हा ग्रंथ त्यांच्या संघर्षाचा दस्तावेज आहे. गळ्यात गाणे आणि मनगटात तलवार असा आगळा संगम त्यांच्यात झाला आहे. त्यांच्या संघर्षाचे उदाहरण आणि संस्कार डोळ्यासमोर ठेवूनच आमची जडणघडण झाली आहे. कार्यकर्ता असणे म्हणजे काय, हे आम्ही रूपाताईंसारख्या लोकांकडून शिकलो’, असे अरुणा सबाने यांनी सांगितले.

डॉ. श्रीकांत तिडके यांनीदेखील डॉ. रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या विविध गुणांचा आणि कार्याचा उल्लेख केला. ‘जे बोलतो ते करून दाखवावे’, असा रूपाताईंचा आग्रह असतो. कुटुंबाच्या संस्काराचा वारसा त्यांनी वसा म्हणून चालवला आणि स्वीकारलेल्या मूल्यांमध्ये कधीही तडजोड केली नाही. रूपाताई आणि पंडिता रमाबाई यांचा तुलनात्मक अभ्यास व्हायला हवा, असे डॉ. तिडके म्हणाले.

रूपाताई म्हणजे ४५ वर्षे चाललेले प्रबोधनाचे धगधगते आंदोलन आहे, असे सीमा मेश्राम यांनी सांगितले. नरेश वाहणे यांनीही मनोगत व्यक्त केले.

वरिष्ठ पत्रकार रवी गजभिये यांनी निवृत्त न्यायाधीश आणि डॉ. रूपा कुलकर्णी-बोधी यांचे बंधू सत्यरंजन धर्माधिकारी यांचे भाषण वाचून दाखवले. विलास भोंगाडे यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ पत्रकार केवल जीवनतारे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि डॉ. कुलकर्णी यांचा संदेश वाचून दाखविला. कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष गिरीश गांधी, ज्येष्ठ विचारवंत इ. मो. नारनवरे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.