विदर्भातील नागरिकांना मे महिन्याच्या उत्तरार्धात एक अनोखा खगोलीय अनुभव पाहायला मिळणार आहे. सूर्य अगदी डोक्यावर आल्याने काही क्षणांसाठी वस्तूंची सावली पूर्णपणे नाहीशी होण्याची घटना म्हणजेच ‘ शून्य सावली दिवस ’ यंदाही विदर्भात अनुभवता येणार आहे.
नागपुरात हा अनुभव २६ मे रोजी दुपारी १२.१० वाजता पाहायला मिळणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. या दिवशी सूर्याचे स्थान पृथ्वीच्या विशिष्ट अक्षांशावर अगदी लंबवत येते. त्यामुळे उभ्या वस्तूंची सावली काही क्षणांसाठी दिसेनाशी होते. हा अनुभव वर्षातून दोन वेळा उष्ण कटिबंधातील भागांमध्ये दिसून येतो.
विदर्भातील विविध शहरांमध्ये १७ मेपासून २८ मेपर्यंत हा खगोलीय प्रकार अनुभवता येणार आहे. खगोल अभ्यासकांच्या मते, शून्य सावली दिवस हा खगोलशास्त्र समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अनुभव असतो. या वेळी जमिनीवर उभी ठेवलेली काठी, बाटली किंवा कोणतीही सरळ वस्तू काही क्षणांसाठी सावली टाकत नाही. त्यामुळे विज्ञानप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी हा अनुभव प्रत्यक्ष पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







