शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी भेट दिली. मनविसेचे अध्यक्ष आणि मनसे नेते अमित ठाकरे यांची वाढदिवसानिमित्ताने ते सकाळीच इथे दाखल झाले होते. ही भेट वाढदिवसानिमित्त असली तरी राजकीय वर्तुळात मात्र यावरून चर्चेला सुरुवात झाली आहे.
आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या भेटीवेळी शिवसेनेचे (उबाठा) काही पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी दोन्ही युवानेत्यांमध्ये काही वेळ संवादही झाल्याचे सांगितले जाते. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणांवर विविधांगी चर्चा सुरू असताना, ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, अमित यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनीही ‘शिवतीर्था’वर मोठी गर्दी केली होती.





