‘मराठीसोबत हिंदी आले पाहिजे’

महाराष्ट्र टाइम्स

भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी मराठीसोबत हिंदीही बोलता यायला हवे असे वक्तव्य केले. देशात कुठेही गेल्यास हिंदीच उपयोगी पडते असे ते म्हणाले. वडाळा येथे अमराठी भाषकांसाठी आयोजित मराठी शिकण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी आपल्या विजयाचा आणि जात-पात न बघता काम करण्याच्या वृत्तीचाही उल्लेख केला. या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘मराठीसोबत हिंदी आले पाहिजे’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘जसे मराठी बोलता येते, तसेच हिंदीसुद्धा बोलता आले पाहिजे. देशात आपण कुठेही जातो, तिथे मराठी नव्हे तर हिंदीच कामी येते. जे आहे ते आहे’, असे वक्तव्य भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी केले. यावरून नवा राजकीय वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडून सध्या रिक्षा, टॅक्सीचालक, तसेच अमराठी भाषकांना मराठीचे धडे दिले जात आहेत. असाच एक कार्यक्रम वडाळा येथील किडवाईनगरमध्ये शनिवारी पार पडला. ‘मराठी बोला, महाराष्ट्र जोडा... बघताय काय सामील व्हा’ या घोषवाक्याखाली अमराठी भाषकांना मराठीचे धडे किंवा जुजबी मराठी शिकण्यासाठीची प्रशासनाने तयार केलेली पुस्तिका यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे वडाळ्यातील आमदार कोळंबकर यांनीही उपस्थिती लावली. त्यांनी यावेळी हिंदीतून भाषण केले. ‘जसे मराठी बोलता येते, तसेच हिंदीसुद्धा बोलता आले पाहिजे’, असा सूर त्यांनी आळवला.

‘विधानसभेवर निवडून येण्याचा माझा विश्वविक्रम झाला आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारले की, ‘कालिदासजी तुम्ही ५२ जातीच्या मतदारसंघात कसे जिंकून येता?’ त्यावर, मी मतदारांना त्यांचे काम विचारतो, मी जात-पात बघत नाही. जातीचे राजकारण माझ्याकडे चालत नाही’, असे उत्तर दिल्याचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.