‘राजस्थान’ ‘प्ले-ऑफ’मध्येे

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर ३० धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानचा प्ले-ऑफमधील प्रवेश निश्चित झाला. मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत २०५ धावा केल्या होत्या. मुंबईचा संघ १७५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. जोफ्रा आर्चरने मुंबईच्या फलंदाजांना रोखले.

rajasthan royals secures 30 run victory over mumbai indians

मुंबई इंडियन्स संघाला प्रोत्साहित करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर रविवारी २० हजारांहून अधिक शाळकरी मुले-मुली उपस्थित होती. मात्र, त्यांना विजयाची भेट देण्यात मुंबई इंडियन्सचा संघ अपयशी ठरला. ‘मुंबई’ला आयपीएल टी-२० क्रिकेटमधील अखेरच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून ३० धावांनी हार पत्करावी लागली. या विजयामुळे ‘राजस्थान’चा ‘प्ले-ऑफ’ अर्थात अव्वल चार संघांतील प्रवेश निश्चित झाला. ‘राजस्थान’च्या विजयामुळे ‘कोलकाता’, ‘पंजाब’चे आव्हान संपुष्टात आले.

राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २०५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरने रोहित शर्माला शून्यावरच माघारी पाठवले. रोहित आयपीएलमध्ये १९व्यांदा शून्यावर बाद झाला. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलशी त्याने बरोबरी साधली. यानंतर तिसऱ्या षटकात आर्चरने नमन धीरचा त्रिफळा उडवला. पुढच्या षटकात नांद्रे बर्गरने रायन रिक्लेटनचा अडथळा दूर केला. सहाव्या षटकात ब्रिजेश शर्माने तिलक वर्माचा त्रिफळा उडवला. या वेळी ‘मुंबई’ची ५.१ षटकांत ४ बाद ३८ अशी स्थिती झाली होती. ‘राजस्थान’ने निम्मी लढाई जिंकली होती. मात्र, सूर्यकुमार यादव मैदानात असेपर्यंत ‘मुंबई’ला विजयाची आशा होती.

सूर्यकुमारने विल जॅक्ससह पाचव्या विकेटसाठी ३९ चेंडूंत ६३, तर हार्दिक पंड्यासह २५ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी रचली. पंड्याने १५ चेंडूंतच ३५ धावांचा चोप दिल्याने ‘मुंबई’च्या चाहत्यांनी मैदान डोक्यावर घेतले होते. मात्र, आर्चरने पंड्याला बाद करून ‘राजस्थान’ला विजयाच्या मार्गावर नेले, तर बर्गरने सूर्यकुमारला माघारी पाठवून ‘राजस्थान’चा विजय निश्चित केला. आर्चरने अवघ्या १७ धावा देऊन तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. ‘मुंबई’ला यंदाच्या मोसमात ‘वानखेडे’वरील सात पैकी पाच लढतींत पराभव पत्करावा लागला.

तत्पूर्वी, ‘मुंबई’ने नाणेफेक जिंकून ‘राजस्थान’ला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. सर्वांना उत्सुकता वैभव सूर्यवंशीची होती. मात्र, यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि रियान पराग पॉवरप्लेमध्येच माघारी परतले. ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर , दसुन शनाका, डोनोव्हॅन फेरेरा, जोफ्रा आर्चर, रवींद्र जाडेजा यांनी छोट्या-छोट्या खेळी करून ‘राजस्थान’ला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. यात आर्चरच्या ३२ धावा महत्त्वपूर्ण ठरल्या.

संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स - २० षटकांत ८ बाद २०५ (यशस्वी जयस्वाल २७ (१७ चेंडूंत १ चौकार व ३ षटकार), वैभव सूर्यवंशी ४, ध्रुव जुरेल ३८ (२६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार), रियान पराग १४, शनाका २९ (१५ चेंडूंत ३ षटकार), फेरेरा १८, जोफ्रा आर्चर ३२ (१५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकार), रवींद्र जाडेजा नाबाद १९ (११ चेंडूंत ३ चौकार), नांद्रे बर्गर नाबाद १०, दीपक चहर ४-०-४३-२, विल जॅक्स २-०-१२-१, एएम घझनफार ३-०-४५-१, शार्दूल ठाकूर ४-०-४१-२, कॉर्बिन बॉश ४-०-३८-१) वि. वि. मुंबई इंडियन्स - २० षटकांत ९ बाद १७५ (रोहित शर्मा ०, रायन रिकल्टन १२, नमन धीर ६, सूर्यकुमार यादव ६० (४२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार), तिलक वर्मा ३, विल जॅक्स ३३ (१८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार), हार्दिक पंड्या ३४ (१५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार), शार्दूल ठाकूर नाबाद १०, दीपक चहर ८, जोफ्रा आर्चर ४-०-१७-३, नांद्रे बर्गर ४-०-४३-२, ब्रिजेश शर्मा ४-०-२६-२, रवींद्र जाडेजा २-०-२४-०, यशराज ४-०-४४-२).