बारामती : अवैध सावकारीच्या त्रासातून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना पारवडी (ता. बारामती) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनेश गुंडिबा गोसावी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सोनू ऊर्फ लखन यादव डावरे, जयश्री लखन यादव डावरे (रा. साठेनगर, इंदापूर), सतीश शहाजी लांडगे, मारुती हरिदास लांडगे आणि प्रितम ऊर्फ कावा लांडगे (रा. पारवडी, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रूपाली धनेश गोसावी (वय ३६, रा. पारवडी गोसावी वस्ती, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली.
धनेश गोसावी यांनी घेतलेल्या रकमेपेक्षा अधिक पैसे आणि व्याज परत करूनही आरोपींकडून आणखी व्याज व दंडाची मागणी केली जात होती. ‘उर्वरित पैसे दे, नाहीतर जीवे मारू,’ अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे. याला कंटाळून गोसावी यांनी २४ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.






