अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या वेबसाइटला भेट द्यावी किंवा support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर किंवा ८५३०९५५५६४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे माध्यमिक संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.
राज्यातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप (ॲलॉटमेंट) २९ मे रोजी होणार आहे.
उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने शिक्षण संचालनालयाने सोमवारी रात्री उशिरा सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार नोंदणीसाठी (भाग एक आणि दोन भरणे) आज, मंगळवारी (२६ मे) सकाळी सहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना यापूर्वी २५ मेपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणीची मुदत होती. राज्यभरातून विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून मुदतवाढीची मागणी होत होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. शिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार, २५ मेपर्यंत राज्यातील १२ लाख ४१ हजार ५०९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
प्रक्रियेला होणार विलंब
नव्या वेळापत्रकानुसार २६ ते २८ मेदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे पहिली गुणवत्ता यादी आणि प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेलाही काही दिवसांचा विलंब होणार आहे. त्यानंतर २९ मे रोजी सकाळी ११ वाजता पहिली गुणवत्ता यादी आणि कॉलेजांच्या प्रवेशाचे कटऑफ गुण जाहीर केले जातील. विद्यार्थ्यांना २९ मे ते ३ जून या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार असून, ४ जून रोजी ज्युनिअर कॉलेजस्तरावरील कामकाज पूर्ण होईल. त्यानंतर ५ आणि ६ जूनला डेटा प्रक्रिया केली जाईल, तर ६ जून रोजी रात्री १० वाजता दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थी, पालक तसेच ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.






