राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने काढलेल्या चुकीच्या आदेशामुळे सरकारी धान्य गोदामातील सुमारे दहा हजार माथाडी कामगार बेरोजगार होण्याची भीती व्यक्त करून त्याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
२५-२६ मे रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी ठिय्या-धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व गोदामांतील हमाल कष्टकरी सहभागी होणार आहेत; तसेच बाजार समितीमधील आडत, किराणा, भाजी मार्केट, कारखाने आदी ठिकाणचे माथाडी कामगारही या आंदोलनात सहभागी झाल्याचे मराठवाडा लेबर युनियनने पत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, माथाडी कायद्याची कठोर व काटेकोर अंमलबजावणी करावी, बेकायदा काढलेल्या माथाडी कामगारांना पोलिस संरक्षण देऊन पूर्ववत कामावर पाठवावे, वेतनवाढीचे करार निर्धारित वेळात करावेत, सरकारी धान्य गोदाम , लिकर व अन्य ठिकाणची थकबाकी वसुली निश्चित कालमर्यादेत वसूल करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठामंत्री, कामगारमंत्र्यांना पाठवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस ॲड. सुभाष सावंगीकर आदींनी कळवले आहे. पुरवठा विभागाने परिपत्रकातील चूक तात्काळ दुरुस्त केली नाही, तर २७ मेपासून जिल्ह्यातील सरकारी धान्य गोदामांतील सर्व काम बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू केले जाईल, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.






