लातूर : ‘नीट’ दिलेल्या गोंदेगाव येथील विद्यार्थिनीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मैथिली अशोक सोनवणे (वय १८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, १६ मे रोजी सकाळी लातूर तालुक्यातील गोंदेगाव शिवारात ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी गातेगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मैथिलीने ‘नीट’ची तयारी कोणत्याही खासगी क्लासशिवाय घरी राहून केली होती. ‘नीट’च्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर ती मानसिक तणावात असल्याचे तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. १६ मे रोजी सकाळी ती शेतात गेल्यानंतर ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने मुरुड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिने लातूर येथील जयक्रांती महाविद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. दहावीत ८१ टक्के गुण मिळवलेल्या मैथिलीने यंदा बारावीत ५१.५० टक्के गुण मिळवले होते. तिने ‘नीट’बरोबरच ‘सीईटी’ परीक्षाही दिली होती. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नसून, आत्महत्येचे काही कारण आहे का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






