‘एनटीए’ने कोणताही धडा घेतला नाही

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांना अटक झाली आहे. सीबीआयने त्यांना पैशाच्या बदल्यात प्रश्न विकल्याचा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एनटीएच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एनटीएने मागील प्रकरणांतून काहीच शिकले नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. एनटीएच्या जागी सक्षम संस्था नेमावी, या मागणीवर न्यायालयाने केंद्र सरकार आणि एनटीएला नोटीस बजावली आहे.

‘एनटीए’ने कोणताही धडा घेतला नाही

नवी दिल्ली : ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनीषा हवालदार या पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिकीने पैशाच्या बदल्यात प्रश्न आणि मजकूर विद्यार्थ्यांना दिल्याचा दावा सीबीआयने तिची कोठडी मागतात पुणे न्यायालयात केला. ‘नीट’च्या भौतिकशास्त्राच्या पेपरसाठी अधिकृत अनुवादक म्हणून काम केलेली हवालदार पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय चाचणी संस्थेने ( एनटीए ) मागील पेपरफुटी प्रकरणांतून कोणताच धडा घेतला नसून, ही खेदाची बाब आहे, अशी स्पष्ट नापसंती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केली.

वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी ‘एनटीए’च्या जागी एखादी अधिक सक्षम आणि स्वायत्त संस्था नेमावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर न्यायालयाने केंद्र सरकार, ‘एनटीए’ आणि केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) नोटीस जारी करीत स्पष्टीकरण मागवले.

न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. आलोक अराधे यांच्या खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यासह इतर पक्षकारांना याचिकांच्या प्रती देण्याचे निर्देश दिले. तसेच, न्यायालयाने २०२४मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालक केले का, याबाबत ‘एनटीए’ला गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.

‘आधीच्या प्रकरणांतून ‘एनटीए’ने काहीच धडा घेतला नाही, हे दुर्दैवी आहे. असे प्रकरण यापूर्वीही या न्यायालयात आले होते. त्यावेळी एक देखरेख समिती नेमण्यात आली होती. या समितीने काही शिफारशी केल्या होत्या आणि त्या स्वीकारण्यात आल्या होत्या. त्या समितीने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, याविषयी ‘एनटीए’ने प्रतिज्ञापत्र सादर करावे,’ असे खंडपीठाने नमूद केले.