छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येरवडा मनोरुग्ण ालयात दाखल झालेल्या ३२ वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केल्यावर ती पाच आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. मनोरुग्णालय प्रशासनाने तातडीने वाळूज पोलिसांना पत्रव्यवहार करून ही माहिती कळवली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज पोलिसांना १२ दिवसांपूर्वी एक मनोरुग्ण महिला आढळून आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी महिलेला जवळील एका आश्रमात दाखल केले. संबंधित महिला मनोरुग्ण असल्याने आश्रमाने तिला १५ मे रोजी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले.
अनोळखी महिला रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांची नियमानुसार वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानुसार डॉक्टरांनी सर्वप्रथम महिलेची तपासणी केली. त्यात ही महिला गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी महिलेला ससून रुग्णालयात नेऊन तिची सोनोग्राफी करून घेतली. त्यामध्ये ती पाच आठवड्यांची गर्भवती दिसून आली.
पीडित महिला मनोरुग्ण असल्याने ती स्वतःची देखभाल करू शकत नाही. नऊ महिन्यांनी बाळ जन्मल्यावर बाळाचा व्यवस्थित सांभाळ करू शकण्यास ती सक्षम नाही; त्यामुळे महिलेचा गर्भपात करणे उचित राहील, असे मत स्त्रीरोगतज्ज्ञांनी मांडले.
वाळूज पोलिसांनी पीडित महिलेला आश्रमामध्ये दाखल केले होते. त्यामुळे मनोरुग्णालय प्रशासनाने वाळूज पोलिसांना पत्रव्यवहार करून ती महिला गर्भवती असल्याचे कळविले आहे. यावरून मनोरुग्ण महिलेवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न होत आहे, असे मनोरुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
राज्यात एकीकडे बालके, अल्पवयीन मुली आणि महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या असताना नराधाम आता मनोरुग्णांनाही लक्ष्य करू लागल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.






