‘तू माझ्या मुलीला घेऊन जाऊ नको. तू तिचा नीट संभाळ करीत नाही,’ असा आरोप करून जावयाला सासरा आणि मेव्हण्याने शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. ही घटना २४ मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पहाडसिंगपुरा परिसरात घडली. मारहाण करणाऱ्या सासऱ्याचे नाव पेतरस रंगनाथ जाधव आणि मेव्हण्याचे नाव राहुल पेतरस जाधव (दोघे रा. साई मंदिराजवळ, पहाडसिंगपुरा) असे आहे.
या प्रकरणात विनोद शांतिलाल आरसूड (वय २७, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विनोद आरसुड हे मजुरी व रंगकाम करतात. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते पत्नी आणि आठ दिवसांच्या मुलीला घेण्यासाठी पहाडसिंगपुरा येथे सासरी गेले होते. पत्नीला घेऊन परत संजयनगरकडे जात असताना साई मंदिराजवळ त्यांच्या सासऱ्याने त्यांना अडवले. ‘तू माझी मुलगी घेवून जावू नको. तिला तुझ्याबरोबर पाठवायचे नाही. तू तिचा आणि मुलीचा नीट सांभाळ करत नाहीस,’ असे म्हणून सासरे पेतरस जाधव याने आरसूड यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर रस्त्यालगत पडलेली लाकडी काठी उचलून त्यांच्या डोक्यात मारली. ती अडवण्याच्या प्रयत्नात त्याच काठीने नाकावर मार लागल्याने त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाला. या वेळी मेव्हणा राहुल जाधव यानेही शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुन्हा येथे आलास तर जीवे मारून टाकू, अशी धमकीही दिली.






